आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिरोगी जीवन जगण्यासाठी दररोज एक तास योगासने व प्राणायामाचा सराव करा. माणूस कितीही थकलेला असला तरी योगासने केल्याने मन प्रफुल्लीत राहते. जीवनात कितीही पैसा कमवला पण आरोग्य ठीक नसेल तर तो निरर्थक आहे. वेळात वेळ काढून नियमित योगासने करायला हवी, असा सल्ला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. डॉ. सचिन वांद्रे यांनी दिला.
शहरातील कोटेचा महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे ऑनलाइन योग प्राशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
योगासनांसाठी वेळ द्या : सध्याचे युग हे धावपळीचे आहे. शरीराची काळजी घेण्यासाठीही आपण पुरेसा वेळ देऊ शकत नाही, असे चित्र समोर येते आहे. मात्र, वेळेचे अचूक नियोजन करून योगासनांसाठी वेळ दिला पाहिजे. कारण आरोग्य हीच आपली मोठी संपत्ती आहे.
चाळीशीनंतरची दक्षता : प्रमुख वक्ते व मार्गदर्शक योगशिक्षिका डॉ. सीमा पाटील या होत्या. त्यांनी दैनंदिन जीवनात योगाचे असलेले महत्व प्रात्यक्षिकासह पटवून दिले. स्त्रियांनी पार्लरमध्ये जाण्यापेक्षा घरीच कोणते पॉईंट्स दाबले म्हणजे आपला चेहरा उजळेल, चाळीशीनंतर स्त्रीयांना भेडसावणाऱ्या शारीरिक व्याधी आणि त्या संदर्भात घ्यावयाची दक्षता व प्राणायाम यांचे असलेले महत्व सांगितले.
उपक्रमांचा लाभ घ्या : अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वाय. डी. देसले हे होते. त्यांनी महाविद्यालयाद्वारे आयोजित अशा विविध उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शुभांगी राठी यांनी केले. आभार डॉ. शरद अग्रवाल यांनी मानले.
आरोग्य संवर्धनाचे धडे
योग प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी वक्त्यांनी योगाचे जीवनातील महत्व विविध संदर्भ देऊन स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा विभागीय समन्वयक डॉ. मनिष करंजे, भुसावळ तालुका समन्वयक डॉ.पी.ए. अहिरे यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे शिक्षक, भुसावळ शहरातील महिला, माजी विद्यार्थिनी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सहभागी होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.