आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंबी:स्वत: पाहणी करा, राखेच्या प्रदूषणाचे प्रश्न सोडवा, अन्यथा हक्कभंग आणू

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दीपनगर औष्णिक केंद्रामुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडला होता. त्यास उत्तर देताना शासनाने उच्चस्तरीय चौकशीचे आश्वासन दिले होते. असे असले तरी महानिर्मिती मात्र प्रदूषण होत नसल्याचा दावा करते. याअनुषंगाने खडसेंनी रविवारी स्वत: महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांसोबत वेल्हाळे परिसरात पाहणी केली. त्यात समोर आलेली प्रदूषणाची समस्या पाहून त्यांनी महानिर्मितीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. आपण स्वत: येऊन स्थानिक लोकप्रतिनिधींसह पाहणी करावी. राखेच्या प्रदूषणामुळे निर्माण झालेला प्रश्न सोडवावा. अन्यथा महानिर्मितीकडून चुकीची माहिती दिली जात असल्याने हक्कभंग दाखल करू, अशी तंबी दिली.

वेल्हाळे येथील अॅश बंडच्या कामासाठी अवैध खोदकाम, व्हॉल्व्हद्वारे राख तलावात सोडणे, किन्ही व जांभुळ नाल्यातील राखेचे थर, तापी व भोगावती नदीत राख सोडणेे अशा तक्रारींच्या अनुषंगाने आमदार खडसे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी प्रश्न मांडला होता. दरम्यान, वेल्हाळे अॅश बंडामुळे होणाऱ्या राखेच्या प्रदूषणाचे आरोप महानिर्मिती नाकारते. त्यामुळे या विषयातील सत्यता पडताळणीसाठी रविवारी आमदार खडसे यांनी वेल्हाळे अॅश बंड गाठला. जांभुळ नाल्यातून तलावात राख जाते का? याची पाहणी केली. दीपनगर केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड, जि.प.चे माजी सदस्य राजेंद्र चौधरी, सुधाकर जावळे, वेल्हाळे येथील शेतकरी नागो पाटील, माजी उपसरपंच अशोक शिंदे, आकाश कुरकुरे उपस्थित होते. या सर्वांनी राखेमुळे होणाऱ्या प्रदुषणाची तीव्रता लक्षात आणून दिली.

कारवाई का नाही?
महानिर्मितीने बंडाजवळ ५५ लाख रुपयांचे काम केले. या कामासाठी परिसरात वन विभागाच्या जागेवर खोदकाम झाले. यामुळे बंड फुटून गावाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी तक्रार नागो पाटील यांनी केली. हे काम महानिर्मितीच्या एका माजी अभियंत्याने दुसऱ्याच्या नावे घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.

एफजीडी यंत्रणा का बसवली नाही?
खडसेंनी वेल्हाळेतील हेमाडपंथी महादेव मंदिर, हनुमान मंदिर, लकडूबुवा व भवानी मंदिर परिसरात पाहणी केली. या मंदिरांसोबतच शेतातील पिकांवर राखेचा थर दिसला. यामुळे त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर अधिकारी निरूत्तर झाले. ५०० बाय दोनच्या प्रकल्पात एफजीडी व एससीआर यंत्रणा न बसवल्याने प्रदूषण वाढले. २०१९ मध्ये ही यंत्रणा बसवणे गरजेचे होते, असे राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.

किन्ही नाल्यात आढळली सर्वत्र राख
आमदार खडसे यांनी केलेल्या पाहणीत किन्ही नाल्यात राखेचे प्रमाण सर्वाधिक आढळले. वॉटर रिकव्हरीजवळ राखमिश्रीत पाणी तलावात सोडले जाते. यामुळे परिसरातील खडका, किन्ही, साकरी, शिंदी, जाडगाव, मन्याारखेडा येथील पाण्याचे उद्भव दूषीत होत असल्याची ओरड अनेकांनी केली. यानंतर खडसेंनी महानिर्मितीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन यांना संपर्क साधला.

बातम्या आणखी आहेत...