आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारण:यावल-रावेर तालुक्यातून होणारा देशांतर्गत केळीचा पुर‌वठा निम्म्याने घटला; सध्या 700 नव्हे, 250 ट्रकांमधून वाहतूक

रावेर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कडाक्याची थंडी, तीव्र तापमान आणि यानंतर भारनियमनामुळे जिल्ह्यातील केळीला कोट्यवधींचा फटका बसला. यामुळे केळी लागवडीचे नियोजन बिघडून यंदा एक महिना लवकर माल तयार होऊन तो कापला देखील गेला. यानंतर कापणी योग्य मोजकी केळी शिल्लक होती. मात्र, ३० मे, ८ जून आणि ११ जून या एकाच पंधरवड्यातील सलग तिसऱ्या आपत्तीत ती मातीमोल झाली.

नेमके याच कालावधीत श्रीगर, जम्मू, हरियाणा, पंजाबातून केळीची मागणी वाढून भाव १६०० ते १८०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले. मात्र, पुरेसा पुरवठा नसल्याने यावल-रावेर तालुक्यातून दररोज सुमारे ७०० ट्रकमधून होणारी केळी निर्यात निम्मे पेक्षा जास्तीने कमी होऊन २५० ट्रकपर्यंत खाली आली आहे. परिणामी बोर्डावर उच्चांकी भाव दिसत असूनही त्याचा शेतकऱ्यांना उपयोग नाही. आता कापणीयोग्य केळी तयार होईपर्यंत हे चित्र तूर्त तरी बदलणार नाही.

जळगावच्या केळीला मागणी का?
मध्यंतरी आंध्र प्रदेश, पश्चिम महाराष्ट्रात वादळाने केळीचे नुकसान झाले. परिणामी पुरेसा माल उपलब्ध नाही. तर गुजरातच्या केळीला स्वाद व चकाकी नसल्याने बाजारात मागणी नाही. मात्र, जळगावात पिकवल्या जाणाऱ्या केळीला चकाकी सोबतच गोडवा असल्याने मागणी जास्त आहे. सध्या भावही १६०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल आहे. पाच दिवसांपूर्वी तर बऱ्हाणपूर बोर्डात २२१० रुपयांचा भाव मिळाला होता.

यामुळे बिघडले पुरवठ्याचे गणित
एकाच पंधरवड्यात ३० मे, ८ व ११ जून रोजी वादळाचा तडाखा बसला. त्यात रावेर, यावल, चोपडा या केळी पट्ट्यात १,५६३ हेक्टरवरील केळी बाधित झाली. ज्या केळी बागा मातीमोल झाल्या त्यापैकी बहुतांश केळी बागा कापणीवरआलेल्या होत्या. त्यामुळे तयार माल उपलब्ध नाही. यामुळे मागणी व पुरवठ्याचे गणित बिघडले.

उत्तर भारतातील बाजारपेठेत केळी पोहोचवण्यासाठी वॅगनच्या भाड्यात दिले जाणारे अनुदान रेल्वे बोर्डाने बंद केले. यामुळे रावेर, निंभोरा व सावदा मालधक्क्याहून गेल्या तीन आठवड्यापासून रेल्वेने केळी वाहतूक बंद आहे. दुसरीकडे ट्रकद्वारे लांब अंतरावर केळीची वाहतूक अधिक खर्चिक व नुकसानदायक ठरते.

रस्ते मार्गाने वाहतूक परवडत नाही
रेल्वे वॅगनने केळी वाहतुकीसाठी मिळणारे अनुदान रेल्वे बोर्डाने बंद केले. यामुळे पंधरवड्यापासून रेल्वेने केळी वाहतूक बंद आहे. परिणामी रस्ते मार्गाने ट्रकद्वारे केळी वाहतूक वाढली होती. ही संख्या दररोज ६७५ ते ७०० ट्रक एवढी होती. मात्र, मध्यंतरी वादळाने केळी बागा आडव्या झाल्या. कापणी योग्य केळी उपलब्ध नसल्याने सध्या दररोज सुमारे २५० ट्रक भरतील एवढा माल उपलब्ध होतो.
विनायक महाजन, व्यापारी, अजनाड ता.रावेर

बातम्या आणखी आहेत...