आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजी उफाळली:कार्यकारिणीत डावलले; वरणगावी जिल्हाप्रमुखांच्या घरासमोर आंदोलन

वरणगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेची भुसावळ तालुका व शहर कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात निष्ठावंतांना डावलून जे शिवसेनेचे सदस्य देखील नाहीत अशा मर्जीतल्या कार्यकर्त्यांना विविध पदे दिल्याने जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या निवासस्थानासमोर शिवसैनिकांनी आंदोलन केले. सध्या शिवसेनेत ठाकरे गट व शिंदे गट असा संघर्ष राज्यात सुरू आहे. शिवसैनिक अद्यापही ठाकरेंच्या शिवसेना पक्षात आहेत तर काही सोडून गेले. शिवसेनेची तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात निष्ठावंतांना डावलत ज्यांचा पक्षाशी संबंधही नाही तसेच सदस्यही नाही त्यांचा समावेश केला आहे.

तसेच पक्षाच्या विरोधात लढून निवडणुकीत पराभूत झालेले विरोधक व जिल्हाप्रमुख महाजन यांच्या मर्जीतील, कार्यकर्त्यांना विविध पदे देण्यात आली. यामुळे नाराज झालेले दीपक धांडे, बबलू बऱ्हाटे, निर्मल दायमा, जंगू खराटे, शरद जैस्वाल, नीलेश महाजन, हेमंत बऱ्हाटे, सूरज पाटील, चेतन नाईक, धीरज सोनवणे, पवन भोळे, मनोज पवार, मेहमूद भाई, शांताराम भोई, चेतन भोई, गोकूळ बावस्कर, नितीन देशमुख आदी कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी समाधान महाजनांच्या निवासस्थानाबाहेर घोषणा देत आंदोलन सुरू केले. जिल्हाप्रमुख महाजन काही कारणामुळे बाहेरगावी गेले होते. ते आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. तुमचे म्हणणे लेखी स्वरूपात द्या, वरिष्ठांना कळवतो असे सांगितले. यावर कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही. वरिष्ठांना भेटण्याच्या तयारीने ते माघारी परतले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच येथील पोलिस ठाण्याचे सपाेनि आशिषकुमार आडसुळ, पाेउनि परशुराम दळवी, हवालदार राहुल येवले व सहकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला. पदाधिकारी विलास मुळे, संतोष माळी, हिप्पी शेख, सईद शेख आदी उपस्थित होते.

ते कट्टर शिवसैनिक नाही, पक्षाचा प्राेटाेकाॅल माेडला
भुसावळ शहर व तालुका कार्यकारिणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जाहीर केली आहे. तरीही नाराज झालेल्या शिवसैनिकांनी माझ्या घरासमोर आंदोलन व घोषणाबाजी करून पक्षाचा प्रोटोकाॅल मोडला आहे. यापूर्वीही त्यांनीच भुसावळ तालुक्यात गटातटाचे राजकारण केले. हे कट्टर शिवसैनिक नाहीत. त्यांचे आजचे अांदाेलन वेगळ्या हेतून होते.
समाधान महाजन, जिल्हाप्रमुख, वरणगाव

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार
निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे खच्चीकरण करणे व निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून मर्जीतील कार्यकर्त्यांचा समावेश केला. भुसावळ तालुक्यात लेवा पाटीदार समाज बहुसंख्य असताना यांनी त्यांच्याकडील तालुकाप्रमुख, शहरप्रमुख ही पदे काढून घेतली. यामुळे आगामी निवडणुकीत पक्षाला फटका बसू शकतो. याबाबत महाजन यांच्या घरासमोर आंदोलन केले. त्यांच्याकडून समर्पक उत्तर न मिळाल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहाेत.
बबलू बऱ्हाटे,
माजी शहर प्रमुख, शिवसेना.

बातम्या आणखी आहेत...