आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:वातावरण बदलाने बालरुग्ण दुप्पट,‎ खोकल्याचा त्रास 15 दिवस कायम‎

भुसावळ‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वातावरणातील बदलामुळे शहरात गेल्या‎ पंधरवड्यापासून बालरुग्णांचे प्रमाण‎ वाढले आहे. रुग्णालयांमध्ये ओपीडी‎ दुप्पट झाली आहे. यात प्रामुख्याने‎ इन्फ्लूएंझा विषाणूजन्य आजाराचे प्रमाण‎ अधिक आहे. १५ दिवस कफ सिरफ व‎ अॅन्टीबायोटिक औषधे देवूनही ४० टक्के‎ बालरुग्णांचा खोकला थांबत नसल्याची‎ गंभीर बाब समोर आली आहे.‎ बालकांमध्ये अॅडीनो व्हायरसची लागण‎ असल्याचाही संशय आहे. मात्र तब्बल‎ सहा हजार रुपये खर्च असल्याने ही‎ चाचणी केली जात नाही. यामुळे सध्यातरी‎ अॅडीनो व्हायरसचा एकही रुग्ण समोर‎ आला नाही. लक्षणे मात्र इन्फ्लुएंझा व‎ अॅडिनो व्हायरसची असल्याची माहिती‎ तज्ज्ञांनी दिली.‎ ४० टक्के बालरुग्णांना १५ दिवस कफ‎ सिरफ देवूनही खोकला थांबत नसल्याची‎ स्थिती आहे. तर बालकांमध्ये अचानक‎ पांढऱ्या पेशी कमी होणे, उलट्या,‎ डायरिया आदी लक्षणेही आढळून येत‎ आहेत. सध्या बालरुग्णांचे प्रमाण‎ वाढल्याने रुग्णांना वेटींग करावी लागते.‎

हे उपाय गरजेचे‎
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. बाहेरचे अन्न तसेच फास्टफूड‎ टाळावे. हात धुण्याची सवय लावावी. बाहेरुन आल्यावर हातपाय‎ धुवावे. सकस आहार घ्या. फळे, पालेभाज्या, अंडी व डाळींचा‎ आहारात समावेश करावा. मुलांना वारंवार ताप, सर्दी होत असेल तर‎ वर्षातून एकदाइन्फ्लूएंझा लस द्यावी.‎

खोकल्याच्या औषधाचा वापर दुप्पट
खासगी रुग्णालयांसोबतच ;पालिका रुग्णालय व‎ ग्रामीण रुग्णालयाची ओपडीही दुप्पटीपेक्षा‎ अधिक आहे. शासकीय दवाखान्यांमध्ये‎ सर्वाधिक रुग्ण ताप, सर्दी, अंगदूखी,‎ खोकल्याचे आहेत. यामुळे शासकिय‎ रुग्णालयात गेल्या महिन्याच्या तुलनेत या‎ महिन्यात दुप्पट प्रमाणात खोकल्याचे औषध‎ वापरले जात आहे.‎

व्हायरलचे रुग्ण अधिक‎
सध्या बालरुग्णांमध्ये इन्फ्लूएंझा व्हायरलचा‎ आजार वाढला आहे. यात बालरुग्णाला १०१‎ पेक्षा अधिक ताप असतो, थंडी वाजून येते.‎ हातपायदुखी, हगवण-उलटी आदींचा त्रास‎ होतो. अंगावर पुरळ येणे खोकला वाढणे आदी‎ लक्षणे आहेत.तीन ते सात दिवसांत खोकला व‎ ताप बरा होतो. मात्र काही रुग्णांचा खोकला १५‎ दिवसांनी बरा होत आहे.‎- डॉ. पंकज राणे, बालरोग तज्ज्ञ, भुसावळ‎

भीतीचे कारण नाही
बालरुग्णांना रक्त तपासणीत टायफाॅईड, मलेरिया आढळून येत नाही. तर दुसरीकडे प्लेटलेट‎ कमी होत आहेत. १५ दिवस कफ सिरफ देवूनही बालकांचा खोकला कमी होत नाही.यानंतर आयुर्वेदीक औषधे देवून‎ खोकला नियंत्रणात येतो. अॅडीनो व्हायरसची चाचणी खर्चिक असल्याने केली जात नाही. लक्षणांनुसार उपचार करुन‎ बालरुग्ण बरे होतात. भीतीचे कारण नाही. - डॉ. प्रहिज फालक, आनंद नगर, भुसावळ‎

बातम्या आणखी आहेत...