आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रा.पं.निवडणूक:लग्नतिथी, शेतीकामांमुळे दुपारनंतर दुपटीने वाढली मतदानाची टक्केवारी

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोठी लग्नतिथी व शेती कामांचा परिणाम ग्रामपंचायतींच्या मतदान प्रक्रियेवर झाला. भुसावळ, रावेर, यावल, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील मतदान केंद्रांवर दुपारी १२ वाजेपर्यंत संथगतीने मतदान झाले. या टप्प्यात तरुण वर्ग, उमेदवार व समर्थकांनी मतदानासाठी पुढाकार घेतला. यानंतर मजूर व शेतकरी वर्ग घरी परतल्यानंतर मतदानाची टक्केवारी सायंकाळपर्यंत दुपटीने वाढली.

पाचही तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. त्यातही यावल, रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथे उशिरापर्यंत मतदान सुरू होते. सर्वाधिक मतदान बोदवडमध्ये ८०.५५ टक्के झाले. त्या खालोखाल यावल ७९.६७, रावेर ७७.५८, मुक्ताईनगर ७७.४० आणि भुसावळ तालुक्यात ७६.५५ टक्के एवढे मतदान झाले.

भुसावळ तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींमध्ये ६ लोकनियुक्त सरपंच व ५२ सदस्य पदासाठी रविवारी मतदान झाले. त्यात ओझरखेडा येथे ७०.९८ टक्के, तळवेल ६८.७३, माेंढाळा ९२.८८, पिंपळगाव खुर्द ८७.२३, कन्हाळे बुद्रुक ८१.२६ टक्के असे मतदान झाले. तालुक्यात सरासरी ७६.५५ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान मोंढाळा, तर सर्वात कमी राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या तळवेल ग्रामपंचायतीमध्ये झाले. आेझरखेडा, तळवेल, कन्हाळे बुद्रुक येथील काही केंद्रांवर सकाळी तुरळक गर्दी दिसली. मोंढाळे येथे मात्र सकाळी शुकशुकाट होता.

नंतर दुपारपासून केंद्राबाहेरील गर्दी वाढली. मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी उमेदवारांनी रिक्षा व अन्य वाहनांची सोय केल्याने सायंकाळपर्यंत मतदान झाले. सहा ग्रामपंचायतींपैकी माेंढाळे येथे प्रभाग ३ मध्ये सर्वाधिक म्हणजे ९३.१८ टक्के, तर तळवेल येथील प्रभाग ३ मध्ये सर्वात कमी ६७.५ टक्के मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्तासह भरारी पथक नेमले हाेते. संवेदनशील कन्हाळे बुद्रुक येथे अतिरिक्त कुमक होती.

तळवेलला बॅलेट युनिट बदलले
तळवेल (ता.भुसावळ) येथे एका मतदान केंद्रावरील बॅलेट युनिटमध्ये तांत्रिक दाेष निर्माण झाला. यामुळे हे युनीट तत्काळ बदलण्यात आले. दरम्यान, तहसीलदार दीपक धिवरे यांनी सर्व सहा गावांना भेट देऊन आढावा घेतला. दिव्यांग मतदार, वृद्ध मतदारांना मतदान करता यावे यासाठी व्हीलचेअर किंवा अन्य आवश्यक सुविधा पुरण्याचे सांगितले.

पोलिसांची मोबाइल व्हॅन, सोबतची आरसीपी प्लाॅटून प्रत्येक केंद्रांना भेट देत होती. दरम्यान, महसूलच्या आकडेवारीनुसार सहा ग्रामपंचायतींसाठी एकुण ११,९६४ पैकी ९,१५९ मतदारांनी हक्क बजावला. त्यात ४,३१८ महिला व ४,८४१ पुरूष मतदारांचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...