आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी मागणी:आठवडाभरात केळीच्या भावात 230 रुपयांनी वाढ

रावेरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

परराज्यातून केळीला असलेली मागणी व मालाचा जाणवणारा तुटवडा याचा परिणाम केळीच्या भाव वाढीवर झाला आहे. गेल्या आठ दिवसांत केळीच्या भावात प्रति क्विंटलमागे २३० रुपयांची वाढ झाली आहे. बुधवारी रावेर बाजार समितीचे केळीचे भाव १९०० रुपये प्रति क्विंटल जाहीर करण्यात आले आहेत.

तालुक्यातून केळी मोठ्या प्रमाणावर परदेशात व भारतातील विविध राज्यांमध्ये पाठवली जाते. तालुक्यातील सुमारे २२ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीचे उत्पादन दरवर्षी घेतले जाते. सध्या तालुक्यात केळी मालाचा तुटवडा भासत असून परराज्यातील व्यापाऱ्यांकडून दररोज केळीला मोठी मागणी होत आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये केळीवर आलेल्या सीएम व्ही रोगामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील केळीचे नुकसान झाल्याने ती उपटून फेकावी लागली होती. तर एप्रिल व मे महिन्यात अति तापमानाचा फटका पिकाला बसल्याने उत्पादनात घट आली आहे. गेल्या २० दिवसांपूर्वी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा फटका केळी बागांना बसला होता. त्यात कापणीला आलेल्या शेकडो हेक्टरवरील बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून केळीचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला.

मागणीच्या तुलनेत २० टक्के तुटवडा : सध्या परदेशात होणारी केळीची निर्यात बंद आहे. तर उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली व इतर राज्यातून केळीची मागणी होत आहे. व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या मागणी एवढा केळीचा पुरवठा होऊ शकत नसल्याची स्थिती आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने भाव वाढ होत आहे. १५ जूनला केळीचे भाव १६७० रुपये प्रती क्विंटल होते. तर २२ जूनसाठी हेच भाव १९०० रुपयांपर्यंत गेले आहेत. गेल्या वर्षी मे व जून महिन्यात लागवड झालेल्या केळी बागा संपुष्टात आल्या आहेत. तर जुलैमध्ये कमी लागवड झाल्याने या काळात कापणीसाठी केळी बागा शिल्लक नाहीत. रेल्वेद्वारे केळीची निर्यात झाल्याचाही परिणाम केळीच्या तुटवड्यावर झाला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रासह नांदेड व गुजरातमध्ये केळी शिल्लक नाही. बाजारात आंबा व संत्रा यंदा फारसा उपलब्ध नसल्याने केळीला व्यापाऱ्यांकडून वाढती मागणी होत आहे.

धुरखेड्याच्या शेतकऱ्याच्या मालास सर्वाधिक भाव : तालुक्यातील धूरखेडा येथील शेतकरी विपीन नामदेव पाटील यांच्या केळीला शनिवारी २५०१ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. त्या दिवशी रावेर बाजार समितीच्या बोर्डाचा भाव १८२० रुपये प्रती क्विंटल होता. या भावात पाटील यांची १६७ क्विंटल केळीची कापणी झाली होती.