आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाव मिळतो दुप्पट:तांदलवाडीत दक्षिण भारतातील इलायची केळीचा प्रयोग यशस्वी

तांदलवाडी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जिल्ह्यातील केळी संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. लागवडीपासून ते निर्यातीपर्यंत येथील शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत असतात. याच पद्धतीचा प्रयोग आता तांदलवाडी येथील चार शेतकऱ्यांनी इलायची (वेलची) केळीच्या लागवडीतून केला आहे. दक्षिण भारतात ही केळी लावली जाते. या केळीचे उत्पादन तुलनेत कमी असते. कारण, एकरी झाडांची संख्या कमी असते. मात्र, भाव सामान्य केळीच्या तुलनेत दुप्पट मिळतो.

तांदलवाडी येथील शेतकरी प्रेमानंद महाजन, प्रशांत महाजन, अभिजित महाजन व अटवाडा येथील विशाल अग्रवाल यांनी मागील फेब्रुवारी महिन्यात प्रायोगिक तत्वावर इलायची केळीच्या २० हजार खोडांची लागवड केली. आता या केळीची कापणी सुरू आहे. वर्षानुवर्षे एकच वाण लागवड करत असल्याने बाजारात काही वेगळी व्हरायटी यावी यासाठी त्यांनी हा प्रयोग केला.

ही केळी दिल्ली आणि मुंबईच्या बाजारपेठेत पाठवली जाते. या केळीला पाच हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे. वास्तविक सर्वसाधारण पद्धतीने घेतली जाणारी केळी ठेल्यावर विक्री होते. मात्र, इलायची नावाने ओळख असलेली केळी सुपर मार्केट, मॉल, फ्रूट स्टॉल अशा ठिकाणी विक्री होते. त्यामुळे दर चांगले मिळतात.

लागवड यशस्वी, तूर्त निर्यातीएवढा माल नाही
इलायची केळीत कॅल्शिअम, पोटॅशिअम ही दोन्ही खनिजे मुबलक असतात. पोटॅशियमचेमुळे रक्तप्रवाह नियंत्रित राहतो. कॅल्शियममुळे वयानुसार हाडे, दात कमकुवत होणे तसेच हाडांचा ठिसूळपणा इ. समस्यांवर फायदेशीर.

पुढीलप्रमाणे आहेत इलायची केळीचे आरोग्यदायी फायदे
कर्बोदके, अ जीवनसत्व, लोह आणि सफरचंदापेक्षा तीनपट जास्त फॉस्फरसचे प्रमाण असते. पोटॅशियम, फायबर, नैसर्गिक साखर असते.
शरिरातील पाणी पातळी संतुलित ठेवते. जास्त पोटॅशिअम आणि कमी सोडीअम असल्याने उच्च रक्तदाब, हदयरोगींसाठी फायदेशीर.
इलायची केळी लागवड यशस्वी झाली. पण, निर्यात सुरू झालेली नाही. कारण, निर्यातीसाठी किमान एक कंटेनर म्हणजेच २५ टन केळी लागते. एवढी इलायची केळी सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही. पण, सामान्य केळीच्या तुलनेत या केळीला दर चांगले मिळतात. - प्रेमानंद महाजन, शेतकरी, तांदलवाडी ता.रावेर

वेगवेगळी नावे
ग्राहकांची इलायची केळीला पसंती मिळते. बेबी फूड म्हणून तिचा उपयोग होतो. अधिक अन्नद्रव्य असल्याने ही केळी लहान मुले किंवा वयस्कर लोकांसाठी फायदेशीर ठरते. तिचा आकार सामान्य केळीपेक्षा लहान असतो. सालही पातळ असून चव सामान्य केळीपेक्षा गोड असते. महाराष्ट्रात या केळीला इलायची किंवा वेलची, कर्नाटकात येलक्कई, तर बिहारमध्ये चीनीया म्हणतात.

बातम्या आणखी आहेत...