आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराचा विस्तार झपाट्याने वाढत असून त्या तुलनेत शहरातील विविध भागांमध्ये पार्किंगची सुविधा मिळत नाही. सुमारे २ लाख लोकसंख्येच्या भुसावळ शहरात पालिकेचे केवळ एकच अधिकृत पार्किंग आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी संकुलांमध्ये बेशिस्तपणे दुचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर त्याचा थेट परिणाम होतो. शहरात काही ठिकाणी अनधिकृत पार्किंग चालवून वाहनधारकांची लूट केली जात आहे. अवैध पार्किंगमध्ये तासभर दुचाकी वाहन उभे केल्यास १० रुपये आकारले जातात. शिवाय त्याची पावतीही दिली जात नाही.
शहरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना पार्किंगसाठी जागा शोधावी लागते. पालिकेतर्फे स्वतंत्र कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करावी लागता. अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होते. तसेच खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना, वाहनांचा अडथळा पार करत दुकानांपर्यंत जावे लागते. या बाबीचा व्यवसायावर परिणाम होतो. त्यामुळे वाहनधारकांसोबतच व्यापाऱ्यांचीही समस्या वाढली आहे. शहरालगच्या ग्रामीण भागातूनही दररोज मोठ्या संख्येने नागरिक बाजारपेठेत येतात. मात्र पार्किंगची सुविधा नसल्याने जागा मिळेल तिथे वाहने उभी करावी लागतात.
व्यापारी संकुलांसमोर लावलेल्या दुचाकींमुळे तेथील व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागतो. रेल्वे, आयुध निर्माणी, पीआेएच, एमआेएच आणि वरणगाव आयुध निर्माणीचे कर्मचारी बाजारात येतात. त्यामुळे सायंकाळी बाजारपेठेत गर्दी होते. मात्र, रस्त्यात लावलेल्या वाहनांमुळे बाजारात चालणेही कठीण होते. शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, बाबा तुलसीदास व्यापारी संकुल, कपडा मार्केट आदी ठीकाणी समस्या बिकट झाली आहे. प्रत्येक व्यापारी संकुलात ही समस्या आहे.
येथे हाेते अवैध वसूली शहरात अहिल्या देवी कन्या विद्यालयाच्या बाजूला पार्किंग आहे, ते पालिकेचे नाही. मात्र तेथे वाहन भिंतीलगत उभे केल्यास पार्किंगसाठी पाच रूपये ते दहा रूपये वसूल केले जातात. तसेच आठवडे बाजाराच्या परिसरातही सार्वजनिक जागेवर दुचाकी उभी केल्यास १० रूपये पार्किंग शुल्क आकारले जाते. डेलीबाजारात धान्य बाजराच्या बाजूने एका ठिकाणी पार्किंगसाठी अशीच वसुली केली जाते. पालिकेन पार्किंगचा ठेका दिलेला नाही. तरी वसुली का होते, असा प्रश्न आहे.
वॉचनमनची नियुक्ती करावी ^शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात अनेक वाहनधारक अस्ताव्यस्तपणे वाहने उभी करतात. सर्व व्यापाऱ्यांनी मिळून या ठिकाणी पार्किंगवर वाॅचमनची नियुक्ती करावी, अशी अपेक्षा आहे. व्यापारी संकुलासाठी संघटना स्थापन करून पार्किंगसह अन्य प्रश्न मार्गी लावावे. देवेंद्र वाणी, व्यापारी, भुसावळ
पार्किंगवरून होतात वाद, समस्या सोडवा छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात माेठ्या प्रमाणावर वाहने बेशिस्तपणे लावली जातात. त्यामुळे दुकानापर्यंत ग्राहकांना येण्यास माेठी अडचण निर्माण हाेते. येथे सुरक्षा रक्षकाची गरज आहे. त्याच्या माध्यमातून व्यवस्थितपणे वाहने लावता येतील. व्यवसायावर या बेशिस्त पार्किंगचा परिणाम जाणवत आहे. पार्किंगवरून नेहमी वाद होतात. लालाराम जंगले, व्यापारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.