आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश मंडळ:सोन्याचा गणपतीबाप्पा झाला 26.5 ग्रॅम वजनाचा

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘देव बरोबर करतो’ या गणेश मंडळाने यंदा देखील सोन्याची गणेशमूर्ती स्थापन केली आहे. चार वर्षांपूर्वी मंडळाने उत्सवाला सुरुवात केली तेव्हा सोन्याच्या गणपती बाप्पाचे वजन २५ ग्रॅम होते. त्यात यंदा दीड ग्रॅम वजनाची भर टाकण्यात आली. त्यामुळे एकूण वजन २६.५ ग्रॅम झाले. सुंदर नक्षीकाम असलेल्या ही मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते. अकरा दिवसांच्या उत्सवात शेवटच्या दिवशी या मूर्तीची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.

विनोद म्हणून सोशल मीडियावर अनेकांकडून ‘सोन्याचा गणपती’ म्हणजेच सोन्या नावाच्या मुलाने बसवलेला गणपती अशा पोस्ट, संदेश पाहतो. मात्र, यावल शहरात खरोखरचं सोन्याचा गणपती बसवला जातो, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. चार वर्षांपूर्वी शहरातील २० ते २२ वयोगटातील ४०० तरुणांनी एकत्र येत ‘देव बरोबर करतो मित्र मंडळ’ स्थापन केले. मात्र, गणेशोत्सव साजरा करताना भव्य मूर्ती, मोठे डेकोरेशन, रोषणाई, वाद्यांवर होणारा मोठा खर्च, त्यातून होणारे प्रदूषण टाळण्याचा निर्णय घेतला. त्यातून सोन्याचा गणपती बसवण्याची संकल्पना पुढे आली. त्यानुसार गेल्या चार वर्षांपासून शहरातील मेन रोडवरील चावडीजवळ एका छोट्याशा जागेत सुंदर सजावट करून तेथे सोन्याच्या बाप्पाची स्थापना केली जाते. या मंडळाचे अध्यक्ष भैय्या उर्फ मनीष चौधरी, तर सचिन जासूद, गोपाल चौधरी, अभिमन्यू चौधरी, फकिरा पेंटर, राजू बोरसे, अर्जुन चौधरी, सिद्धांत वाणी, विक्की चौधरी, राहुल महाजन, राहूल कोळी आदी सदस्य आहेत. या सर्वांकडून उत्सव साजरा करताना मूर्तीच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते.

आगळेवेगळे विसर्जन
उत्सवात अकराव्या म्हणजेच शेवटच्या दिवशी सोन्याच्या बाप्पाची मूर्ती सजवलेल्या पालखीत ठेवून संपूर्ण शहरातून मिरवणूक काढण्यात येईल. विसर्जन म्हणून सोन्याची ही मूर्ती सराफाकडे नेऊन एक गाठ सोनं (तुकडा) तयार करून सुरक्षित ठेवले जाईल. पुढील वर्षी त्यात पुन्हा सोन्याची भर टाकून वाढीव वजनाची मूर्तीचा तयार करण्यात येईल.

दरवर्षी करणार वाढ
शहरातील दात्यांकडून मिळालेली वर्गणी आणि त्यात कार्यकर्त्यांनी यथाशक्ती दिलेले योगदान मिळून पहिल्या वर्षी २५ ग्रॅम वजनाची सोन्याची मूर्ती स्थापन करण्यात आली. त्यात दरवर्षी वाढ करण्याचा मंडळाचा संकल्प आहे. मध्यंतरी काहीशा अडचणी होत्या. मात्र, यंदा त्यात दीड ग्रॅमची भर टाकल्याने हे वजन २६.५ ग्रॅम झाले.

बातम्या आणखी आहेत...