आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासन:अपंगत्वाचा ग्रामसेवकांनी लाभ घेतलाच नाही : बीडीओ लाभ घेतल्याचा अहवाल बीडीओंचाच : दिव्यांग संघटना

रावेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पंचायत समितीतील पाच ग्रामसेवकांपैकी चौघांनी अपंगत्व प्रमाणपत्राचा लाभ घेतला नसून एकाला वरिष्ठांच्या आदेशावरून बदलीचा लाभ देण्यात आल्याचे बीडीओ दीपाली कोतवाल यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. मात्र याबाबत दिव्यांग संघटनेची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संघटनेला ४ मार्चला दिलेल्या पत्रात या पाचही ग्रामसेवकांनी अपंगत्व प्रमाणपत्राचा लाभ घेतला असल्याचे नमूद केले आहे.

तालुक्यातील पाच ग्रामसेवकांनी बनावट अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे योग्य त्या ठिकाणी बदलीचा लाभ घेतल्याची तक्रार दिव्यांग संघटनेने केली आहे. त्यासंदर्भात बीडीओ कोतवाल यांनी मंगळवारी पत्रकारांना माहिती दिली. ग्रामसेवक नितीन महाजन, राहुल लोखंडे, रवींद्रकुमार चौधरी व छाया नेमाडे यांनी तालुक्यांतर्गत बदली आदेशात अपंग प्रमाणपत्राचा लाभ घेतलेला नाही. तर शामकुमार पाटील यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशावरून लाभ दिला आहे. तसेच सदर प्रमाणपत्रे खोटी आढळल्यास गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सकाच्या १७ फेब्रुवारीच्या अहवालानुसार एसएडीएम प्रणालीनुसार हे प्रमाणपत्र सत्य असल्याचे बीडीओ दीपाली कोतवाल यांनी पत्रकारांना सांगितले. या सर्व घडामोडींवर मात्र तालुक्यातील दिव्यांग संघटेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

विभागीय आयुक्तांकडे दाद मागणार
अपंगत्वाच्या प्रमाणपत्राच्या आधारे योग्य त्या ठिकाणी बदलीचा लाभ पाच ग्रामसेवकांनी घेतल्याचे पत्र बीडीओ कोतवाल यांनी ४ मार्चला दिव्यांग संघटनेला दिले आहे. तर २५ नोव्हेंबरला उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवलेल्या अहवालात ग्रामसेवकांनी प्रमाणपत्राच्या आधारे बदलीचा लाभ घेतल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे बीडीओ कोतवाल यांची या प्रकरणातील भूमिका संशयास्पद आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईसाठी विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्यात येईल. रजनीकांत बारी, सचिव, दिव्यांग संघटना, रावेर

बातम्या आणखी आहेत...