आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकांनो, मुले सांभाळा:‘वाचवा’चा आवाज ऐकला अन् शिक्षकाने घेतली तापीत उडी; भावाचा जीव वाचला, बहीण गतप्राण

भुसावळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • झेडटीसी परिसरात गणेश विसर्जनावेळी दुर्घटना, 7 तासांनी मृतदेह सापडला

‘मी आणि दिदी गणपती विसर्जन पाहण्यासाठी नदीवर गेलो होतो. यावेळी दिदीचा पाय घसरला. तिला वाचवताना मी देखील पाण्यात पडलो. शिक्षक काकांनी मला वाचवले,’ अशी आपबीती बारा वर्षीय आर्यन मनीष यादव याने पोलिसांना सांगितली. रविवारी सकाळी ९च्या सुमारास अनन्या (वय १०) आणि आर्यन मनीष यादव हे दाेन्ही बहीण-भाऊ गणपती विसर्जन पाहण्यासाठी नदीवर गेले होते. त्यावेळी झेडटीसी परिसरातील फेकरी स्मशानभूमीजवळील नदीकाठावर सकाळी ९.३०च्या सुमारास ही घटना घडली. संत गाडगेबाबा शाळेतील शिक्षक व अन्य काही असे १० ते १२ भाविक रविवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास झेडटीएस जवळील रेल्वे क्वॅार्टरजवळून गणपती विसर्जनासाठी जात होते. यावेळी रेल्वेत तिकीट तपासणीस असलेले मनीष यादव यांची मुले अनन्या (वय १०) आणि तिचा भाऊ आर्यन (वय १२) हे अंगणात खेळत होते.

उत्सुकतेपोटी हे भाऊ-बहिण लहान सायकलीवर भाविकांच्या मागे गेले. पुढे लहान सायकल फेकरी स्मशानभूमीत टाकून ते पायीच तापी नदीवर भाविकांच्या मागे गेले. श्री विसर्जन करण्यापूर्वी गणरायाच्या आरतीची तयारी सुरू होती. यावेळी दाेन्ही भाऊ, बहीण नदीच्या काठावर उभे असताना अनन्याचा पाय घसरला. हे चित्र पाहून आर्यन तिला वाचवण्यासाठी पुढे सरकला. मात्र, पाय घसरून ताे देखील नदीत पडला. हा प्रकार लक्षात येताच संत गाडगे महाराज हिंदी विद्यालयाचे विज्ञान विषयाचे शिक्षक एन.एन.पाचपांडे (वय ५७) यांनी क्षणात नदी पात्रात उडी मारली. मोठ्या प्रयत्नांती आर्यन त्यांच्या हाती लागला. मात्र, अनन्याचा शोध शक्य झाला नाही.

दरम्यान, अनन्या व आर्यन हे तापी नदीवर गेल्याची माहिती त्यांच्या घरी आई-वडिलांना नव्हती. त्यामुळे घटनास्थळी आर्यनला माहिती विचारल्यावर त्याने आम्ही घरी काेणालाही न सांगता आल्याचे सांगितले. यावेळी काही युवकांनी आर्यनला अाेळखून त्याच्या घरी निरोप दिला. काही मिनिटातच त्याचे वडील मनीष यादव आणि नंतर शहर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे, तालुका पाेलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे, एपीआय रूपाली चव्हाण हे घटनास्थळी आले. निरीक्षक शेंडे यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बचाव पथकाला बोलावले. पथकातील सतीश कांबळे, स्कॅायलॅप डिसुझा, रोहित श्रीवास्तव आदींनी तापी नदीत अनन्याचा शाेध सुरू केला.

दुपारी ४.३० वाजता सापडला मुलीचा मृतदेह
सकाळी ९.३० वाजेच्या या घटनेनंतर बचाव पथकासह अन्य पट्टीच्या पोहणाऱ्यांनी अन्यनाचा शोध सुरू केला. दुपारी देखील शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र, उपयोग झाला नाही. यानंतर सुमारे सात तासांनी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास अनन्याचा मृतदेह घटनास्थळ परिसरात नदीपात्रात अाढळला. पाेलिसांनी पंचनामा केला. मनीष यादव यांच्या माहितीवरून तालुका पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करणे सुरू होते. मृत अनन्या ही रेल्वे स्कूलमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गात होती.

पाच मिनिटांत मुलाला बाहेर काढले, मुलीला वाचवता न आल्याची खंत
संत गाडगे महाराज हिंदी विद्यालयात बसवलेल्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी आम्ही सर्व शिक्षक, काही भाविक रविवारी सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास तापी नदीवर गेलो. गणेश विसर्जनापूर्वी आम्ही आरतीची तयार केली. यावेळी एक रेल्वेगाडी पुलावरून जात असताना मोबाइलमध्ये शुटींग करत होतो. यावेळी माझे कानावर अचानक ‘बचाव बचाव’ असा आवाज पडला. आजूबाजूला नदीपात्रात पाहिल्यावर एक लहान मुलगा पाण्यात पडला असून ताे जीव वाचवण्यासाठी ओरडत असल्याचे दिसले. यानंतर कोणताही विचार न करताच डोळ्यांवरील चष्मा तसाच ठेवत कपड्यांनिशी नदीत उडी मारली.

काही सेकंदात बुडणाऱ्या मुलापर्यंत पोहोचून त्याला धीर दिला. त्याला काठावर अाणले. अवघ्या ९.३० ते ९.३५ या पाच मिनिटात हा थरारक प्रसंग घडला. यावेळी भीतीने गारठलेल्या मुलाच्या तोंडातून माझी दिदी सुद्धा पाण्यात पडल्याचे शब्द ऐकून पुन्हा नदीत उडी घेतली. शक्य तेवढा शोध घेतला. पण पाणी वाहते असल्याने उपयोग झाला नाही. या दुर्घटनेत आर्यनला वाचवता आले, पण त्याची बहीण अनन्याला शोधता आले नाही. अन्यथा तिचा जीव देखील वाचला असता. यामुळे मी दिवसभर बैचेन होतो, अशी आँखोदेखी शिक्षक एन.एन.पाचपांडे यांनी ‘दिव्य मराठी’कडे कथन केली.

बातम्या आणखी आहेत...