आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांमध्ये नाराजी:पुलावरून जड वाहतूक सुरूच, लालपरीला मात्र मनाई ; पुलावरून बस वाहतूक सुरू करण्याची मागणी

मलकापूर पांग्राएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील राहेरी येथील खडकपूर्णा नदीवरील पुलावरील जड वाहनांना बंदी करण्यात आली होती. मात्र या बंदीला झुगारून रात्रीच्या वेळी या पुलावरून सर्रास जड वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तर आता या पुलावरून जड वाहतूक बिनदिक्कत सुरू झाली आहे. परंतु आजही या पुलावरून बसची वाहतूक शंभर टक्के बंद आहे. साखरखेर्डा ते सिंदखेड राजा या रस्त्यावर बस नसल्याने प्रवाशांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी दुचाकी अथवा खासगी वाहन किंवा पायी जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. या पुलावरून जड वाहतुकीला परवानगी आहे. तर मग प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या या पुलाला बसची ऍलर्जी का, असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत. कोकणातील सावित्री नदीवरील पूल कोसळल्याने राज्यातील सर्व मुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यामध्ये दुसरबीड जवळ असलेल्या खडकपूर्णा नदीवरील राहेरी पुलाचे देखील स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. हा पूल खराब असल्यामुळे त्याची दुरुस्ती करण्यासाठी शासनाने जवळपास पासष्ट लाख रुपये खर्च करून या पुलाची दुरुस्ती केली. मात्र दुरुस्ती केल्यानंतरही हा पूल फार काळ टिकला नाही. हा पूल कधीही कोसळू शकतो. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने शासनाने हा पूल जड वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. या पुलावरून जड वाहतूक होवु नये, यासाठी रस्त्यावर पुलाच्या शेजारी दोन्ही बाजूला लोखंडी गेट तयार केले होते. शिवाय या पुलावरून लाल परीची वाहतुक देखील बंद करण्यात आली होती. मात्र पोलिसांच्या आशीर्वादामुळे या पुलावरून जड वाहतूक रात्रभर सुरु राहत आहे. जड वाहतूक सुरू असल्याने ट्रकने या रस्त्यावर असलेले लोखंडी गेट देखील तोडून टाकले आहे. मेहकर तसेच लव्हाळा या मार्गावरुन औरंगाबाद पुण्याकडे जाणाऱ्या बसेससाठी तढेगाव फाट्यावरून देऊळगाव मही मार्गे बसची वाहतूक वळवण्यात आली. त्यामुळे सिंदखेड राजाला जाण्यासाठी प्रवाशांना बसच राहिली नाही. तढेगाव मार्गे बसची वाहतूक वळवल्याने प्रवाशांना ज्यादा तिकिटाचे पैसे मोजावे लागत आहे. एवढेच नव्हे तर हा रस्ता प्रचंड खराब असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय औरंगाबादला जाणाऱ्या प्रवाशांना प्रमाणापेक्षा जास्त वेळ लागतो. राहेरी पुलावरून जड वाहतुक सुरू असल्यामुळे पूल कोसळू शकत नाही का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पुलावरून जड वाहतुक सूरू झाली. परंतु प्रवाशांच्या सेवेसाठी असलेली लाल परीच या पुलावरून बंद का करण्यात आली, या पुलाला लालपरीची ऍलर्जी आहे का, असा प्रश्न प्रवासी वर्गाकडून विचारला जात आहे. प्रवाशांची हेळसांड थांबवण्यासाठी राहेरी पुलावरून बसची वाहतूक पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी होत आहे. साखरखेर्डां-मलकापूर पांग्रा या परिसरातील लोकांना सिंदखेड राजा येथे तालुक्याच्या ठिकाणी विविध कामाला जावे लागते. परंतु बसची सुविधा नसल्यामुळे प्रवाशांना खाजगी मोटरसायकल किंवा खासगी वाहन करून जावे लागते त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पुलावरून तात्काळ बस सुरु करावी, अशी मागणी देऊळगाव कोळचे सरपंच राजू गायकवाड, मलकापूर पांग्रा माजी सरपंच साबेर खान पठाण, ग्राम विकास अधिकारी उद्धव गायकवाड, शेख सिराज, ग्रामपंचायत सदस्य राजू साळवे, दीपक गवळी यांच्यासह असंख्य प्रवाशांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...