आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:शाळेत इंटरॅक्ट क्लब विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार, रमेश मेहेर यांचे प्रतिपादन

वरणगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. यामध्ये शासन स्तरावरील उपक्रमांना प्राधान्य दिले जाते. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय रोटरीच्या माध्यमातून उद्याचे सुजाण नागरिक घडवण्यासाठी इंटरॅक्ट क्लबची स्थापना करावी. या योजनेचा लाभ मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना करून द्यावा. त्यांच्यामधील सर्वांगीण विकासाला चालना द्यावी, असे प्रतिपादन रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल रमेश मेहेर यांनी केले.

शहरातील रोटरीच्या चार क्लबचे निरीक्षण व परीक्षणासाठी प्रांतपाल रमेश मेहेर हे शहरात दाखल झाले आहेत. त्यानिमित्त ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रथमोपचार मिळावे, यासाठी रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅलीतर्फे, प्रथमोपचार पेटी वाटपाचा कार्यक्रम दीपनगर येथील श्री शारदा माध्यमिक विद्यालयात झाला. या प्रथमोपचार पेटीत प्रथमोपचारासाठी लागणारे साहित्य, सोबतच मुलींसाठी सॅनिटरी पॅडचा समावेश करण्यात आला आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये परिसरातील १५ शाळांना पेटीचे वाटप करण्यात आले. लवकरच इतर शाळांनाही ही पेटी देण्यात येणार आहे. तसेच कापडी पिशव्या यावेळी वाटप करण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली चे अध्यक्ष डॉ.संजू भटकर हे होते. यावेळी क्लबचे सेक्रेटरी जीवन महाजन, ट्रेझरर सुनील वानखेडे, विद्यालयाचे प्राचार्य जी.डी.चौधरी, रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅलीच्या नूतन अध्यक्षा नूतन फालक, सेक्रेटरी मनीषा पाटील, प्रोजेक्ट चेअरमन मीना नेरकर, को-चेअरमन राहुल सोनार, पर्यवेक्षक जे.बी.पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुकेश अग्रवाल यांनी केले. तर आभार धर्मेंद्र मेंडकी यांनी मानले.

शारदा विद्यालय ठरले मानकरी
रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅलीच्या वतीने शाळास्तरावर श्री शारदा माध्यमिक विद्यालयामध्ये प्रांतपाल रमेश मेहेर यांच्या उपस्थितीमध्ये इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली. या क्लबचे अध्यक्ष ओम आवारे तर सचिवपदी मोहीनी सपकाळे यांची निवड करण्यात आली. या क्लबमध्ये एकूण १६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून उपक्रम राबवले जाणार आहेत.

सामाजिक उपक्रम राबवू
अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ.संजू भटकर म्हणाले की ग्रामीण भागातील समाजासाठी कार्य करण्याची गरज आहे. ग्रामीण भागामुळेच शहरी भाग समृद्ध आहे. यामुळे गेल्या वर्षभरापासून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले असून, येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या गरजा सांगाव्यात. त्यानुसार पुढील कार्यक्रमाची आखणी करण्यात येईल, असे ते म्हणाले.

अनुदानित शाळांमध्ये शासनाकडून इतर अनुदान मिळत नसल्याने अडचणी निर्माण होत असतात. त्यात शाळांना शासकीय रुग्णालयाकडून साहित्य मिळत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना जखम झाली असता तात्काळ खासगी रुग्णालय गाठावे लागते. मात्र रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅलीने प्रथमोपचार पेटी वाटप करून स्तुत्य उपक्रम राबवला. - एस.एस.अहिरे, पर्यवेक्षक, पंडित नेहरू विद्यालय, तळवेल

बातम्या आणखी आहेत...