आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांजा प्रकरण:गांजा तस्करीचे केंद्र जळगावचे वनकोठे गाव, नांदेडच्या 'माला’चेही एरंडोल कनेक्शन उघड; 15 दिवसांपूर्वीच बेलदारची चौकशी

गणेश सुरसे | जळगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगावहून 43 किलोमीटर अंतरावरील वनकोठे गावात आम्ही पोहोचलो तेव्हा गावातला रस्ता सुनासुना दिसत होता. अवघ्या 350-400 लोकसंख्येच्या या गावात शेतमजूर आणि शेतकऱ्यांचीच सर्वाधिक संख्या. सारे जण शेतात पांगलेले. बहुतेकांची घरे जुनी आणि कच्ची.

पण गावातल्या मुख्य रस्त्यावर एक टोलेजंग दुमजली बंगला लक्ष वेधून घेतो. पांढऱ्याशुभ्र चुन्याने रंगवलेल्या या बंगल्यात गेल्या अनेक दिवसांपासून फर्निचरचे काम सुरू आहे. बंगल्याभोवती अनेक सालदारांच्या राहुट्या पडलेल्या आहेत. हा बंगला आहे नंदू बेलदार याचा.

तीस वर्षांपूर्वी म्हशींचा पारंपरिक धंदा करणाऱ्या या गृहस्थाची गेल्या दहा वर्षांतील आर्थिक प्रगती तोंडात बोट घालणारी आहे. गेल्या काही वर्षांत गावात याचे प्रस्थ बरेच वाढले आहे. तालुक्याच्या राजकारणातही पाय रोवण्याची तयारी असल्याचे लोक सांगत होते. बेलदाराने गावातील बरीचशी जमीन खरेदी केली आहे आणि गावकऱ्यांना अडीअडचणीत मदत करून सहानुभूतीही कमवली आहे. त्यामुळे नंदू बेलदार आणि गांजा तस्करी याबाबत गावातील कुणीच काही बोलायला तयार नाही.

पण पोलिस रेकॉर्ड बरेच काही बोलतेय :
वनकोठे गावच्या या नंदलाल ऊर्फ नंदू रतन बेलदार याच्यावर सन 2017 मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पोलिस ठाण्यात गांजा तस्करीचा गुन्हा दाखल आहे. यात त्याच्यासह चार जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून चार किलो गांजा जप्त केला होता. त्या खटल्यात बेलदारसह एरंडोलमधील भालगावचा सुनील रघुनाथ मोहिते, औरंगाबादचा विनोद नथ्थू सोळंके आणि इफ्तेकार हारुण कुरेशी हे सारे जामिनावर बाहेर आहेत.

या वेळीही पंधरा दिवसांपूर्वीच एनसीबीच्या पथकाने या गावात येऊन चौकशी केली आणि नंतर नांदेडमध्येही मोठी कारवाई करण्यात आली. नांदेडमधून अटक केलेल्या ट्रकचालक व क्लीनरकडून मिळालेला मोबाइल नंबरही एरंडोलमधील ऑपरेटरचा असल्याचे कळते.

वनकोठेचा पोलिस पाटीलही गांजा तस्करीत अटकेत :
पोलिस पाटलाचे काम गावात कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करण्याचे. पण या वनकोठेचा पोलिस पाटील चंद्रकांत पाटील गांजाच्या तस्करीत आहे. चार महिन्यांपूर्वी ओडिशा पोलिसांनी त्याला अटक केल्याने तेथील कारागृहात शिक्षा भोगतोय. नांदेडमध्ये पकडलेल्या गांजाचा ट्रकचालक सुनील महाजन व क्लीनर गोकुळ राजपूत हे दोघेदेखील याच तालुक्यातील आहेत.

गेल्या वर्षी जळगावमध्ये एमआयडीसी पोलिसांनी 46 लाखांचा गांजा पकडला होता. तो ट्रकही विशाखापट्टणममधून जळगावमार्गे मुंबईला चालला होता. नांदेडमधल्या कारवाईने या भागातील गांजाच्या तस्करीचे धागेदोरे उघड होत आहेत. या कारवाईच्या काही दिवस आधी एनसीबीने वनकोठे गावातही चाचपणी केल्याचे कळते.

15 दिवसांपूर्वीच बेलदारची चौकशी
एनसीबीच्या पथकाने या गावातल्या बेलदार नावाच्या व्यक्तीची 15 दिवसांपूर्वी चौकशी केली आहे. गांजा तस्करीच्या संदर्भात ही चौकशी झाली होती. परंतु, त्याच्याकडून काही ठोस माहिती मिळाली नव्हती. यानंतर नांदेड येथे मोठ्या प्रमाणात गांजा पकडण्यात आला. यात एरंडोल तालुक्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. हा गांजा एरंडोल तालुक्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. - डॉ. प्रवीण मुंढे, पोलिस अधीक्षक

अशी चालते तस्करी :
बेलदाराने गावात बरीच जमीन खरेदी केली आहे. परराज्यातून आलेला गांजा गावातील शेतात चाऱ्याआड रचला जातो. रातोरात या चाऱ्याचे ढीग उभे राहतात आणि दुसऱ्या दिवशी अन्य शहरांकडे वितरित केला जातो. ढीग लागलेल्या गांजाचा उग्र वास मोठ्या प्रमाणात या ग्रामस्थांना येतो, पण बोलत कुणीच नाही.

शिवाजीनगर, सुधाकरनगर, बांभोरी व वनकोठे अशी ही ग्रुप ग्रामपंचायत कासोदा पोलिस ठाण्यापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे गांजाच्या या तस्करीसाठी गावापासून सुमारे 20-25 किलोमीटरचे दूरची शेते निवडली जात असल्याचे कळते.

बातम्या आणखी आहेत...