आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्शन:ज्योतिर्लिंग, साईबाबांचे घेता येईल शहरात दर्शन

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भव्यदिव्य मूर्ती, विद्युत रोषणाई, सजावटीमुळे भुसावळातील गणेशोत्सव जिल्ह्यात आगळावेगळा ठरतो. त्यात अनेक मंडळे वेगवेगळे धार्मिक, ऐतिहासिक स्थळे, गडकिल्ल्यांची आरास साकारतात. त्यात यंदा सुरभी नगरातील जय गणेश फाउंडेशनने भुसावळकरांना बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडवले आहे. तर भवानी पेठ सांस्कृतिक गणेश मंडळाने सलग १७व्या वर्षी श्रीगणेशाच्या मूर्तीला साईबाबांचे रुप दिले आहे. यामुळे भाविकांना एकाचवेळी विघ्नहर्त्यासोबत श्रद्धा, सबुरीची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या दर्शनाची अनुभूती येत आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बहुतांश मंडळांनी आरास उभारणी, सजावटीची कामे पूर्ण केली.

गणेशोत्सवात गेली दोन वर्षे केवळ ४ फूट उंचीची मूर्ती बसवण्याचे निर्बंध होते. यंदा हे निर्बंध नसल्याने शहरातील २५ पेक्षा जास्त मंडळानी बऱ्हाणपूर येथून आणलेल्या सरासरी २० फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती बसवल्या आहेत. या उंच मूर्तींसाठी भव्यदिव्य व्यासपीठ तयार करून सुंदर सजावट केली आहे. शिवाय आरास उभारणीचे काम देखील पूर्णत्वाकडे आहे. काही मंडळांचे पदाधिकारी गुरुवारी देखील सजावटीची कामे करताना दिसली. त्यात पडदे लावणे, रोषणाईसाठी हॅलोजन लावणे, रंगीबेरंगी रोषणाई लावणे, महिला-पुरुषांच्या दर्शनबारीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली.

१७ वर्षांपासून साईबाबांची प्रतिकृती
भवानीपेठ सांस्कृतिक गणेश मंडळाला १९ वर्षे झाली. त्यापैकी १७ वर्षांपासून मंडळ साईबाबांच्या रुपातील श्री गणेशाची स्थापना करते. याशिवाय वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन केले जाते. त्यासाठी पोस्टर्स लावण्याचे काम गुरुवारी सुरू होते. शुक्रवारी ते पूर्ण होईल असे मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य मुळे यांनी सांगितले.

अष्टभुजा मंडळाची २८ फूट उंच मूर्ती लक्षवेधी
शहरातील जामनेर राेडवरील अष्टभुजा गणेश मंडळाचे यंदाचे २६ वे वर्ष आहे. काेराेनाच्या दोन वर्षांचा अपवाद वगळता मंडळाने सलग २३ फुटांपेक्षा जास्त उंच मूर्ती बसवली आहे. यंदा त्यांनी सिंहासनावर आरुढ तब्बल २८ फूट उंच मूर्ती बसवली आहे. ही मूर्ती बऱ्हाणपूर येथून आणल्याचे संस्थापक अध्यक्ष नितीन धांडे यांनी सांगितले.

जामनेर रोडला यात्रेचे स्वरुप
जामनेर रोड भागात सर्वाधिक मोठी मंडळे आहेत. अष्टभूजा मंडळात दर्शन घेतल्यानंतर जय मातृभूमी गणेश मंडळ, तेथून पुढे जय गणेश फाउंंडेशन, शिवमुद्रा मंडळ, बल्लाळेश्वर मंडळ आदी मंडळे आहेत. त्यामुळे गणेशोत्सवात जामनेर रोडला जणू यात्रेचे स्वरुप येते. प्रत्येक मंडळाजवळ खाद्यपदार्थ, खेळण्यांची दुकाने लागतात.

बातम्या आणखी आहेत...