आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथा बंद:आठ डब्यांची आलिशान रेल्वे, 100 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा लवाजमा दिमतीला, महाव्यवस्थापकांचा हा थाट बंद होणार

श्रीकांत सराफ | भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्रजांच्या काळापासून रेल्वेत सुरू असलेल्या अनेक प्रथा परंपरांना रेल्वे बोर्डाने रेड सिग्नल दिला आहे. त्यात आता महाव्यवस्थापकांच्या वार्षिक निरीक्षणात पुरवला जाणारा राजेशाही थाट यापुढे दिसणार नाही. देशभरातील सर्व १७ झाेनचे महाव्यवस्थापक (जीएम) अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसारखेच रेल्वेच्या कामांचे निरीक्षण करतील. त्यांच्यासाठी स्पेशल गाडी, स्वागतासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची फाैज राहणार नाही. मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, पुणे, साेलापूर विभागातील वार्षिक निरीक्षण या पद्धतीने होईल.

रेल्वे बाेर्डाने ३१ डिसेंबरला काढलेले हे आदेश रेल्वेअंतर्गत येणाऱ्या आरडीएसआे, नॅशनल आॅफ इंडियन रेल्वेसह (एनएआईआर) अन्य संस्थांच्या महाव्यवस्थापकांना सुद्धा लागू असतील. दरम्यान, भारतात इंग्रज शासन हाेते तेव्हा विविध कामांच्या निरीक्षणासाठी जाणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना विशेष सेवा देऊन बडदास्त ठेवली जात होती. नंतर १९५१ मध्ये देशभर रेल्वेचे वेगवेगळे झाेन अस्तित्वात आले. तरीही ब्रिटिश काळातील अधिकाऱ्यांच्या शाही परंपरा सुरूच होत्या. या वसाहतवादी मानसिकतेला पूर्णविराम देण्याचे संकेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले हाेते. त्याची आता अंमलबजावणी करण्यात आली आहे.

विशेष गाडी, १०० अधिकाऱ्यांचा ताफा होता...
रेल्वेचे महाव्यवस्थापक वर्षातून एकदा विभागात वार्षिक तपासणी करतात. त्यांच्यासाठी ८ डब्यांची विशेष गाडी असते. दोन महिने आधीच दौऱ्याची मिनिट टू मिनिट आखणी होते. वार्षिक निरीक्षाणावेळी १०० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा जीएमसोबत असतो. त्यात डीआरएम या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते जेवण तयार करणाऱ्या कुकचा समावेश असतो. निरीक्षणावेळी कुठेही गाडी थांबताच एक रेल्वे कर्मचारी डब्याचे हँडल क्लिन करताे, तर दुसरा फूट प्लेट लावताे. हा सर्व राजेशाही थाट आता बंद होईल.

बातम्या आणखी आहेत...