आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या पंधरवड्यापासून पाऊस सुरु असल्याने शहरातील भाजीपाल्याची आवक घटली आहे. तर दुसरीकडे मागणी वाढत असल्याने भाजीपाल्याचे दर प्रतिकिलो सरासरी २० रुपयांनी वाढले आहेत. मेथी, भेंडी, गवार, वाल, चवळी, कारले आदींच्या दरात ही वाढ झाली आहे. उत्पादन वाढल्याने वांगी, गंगाफळाचे दर मात्र ५ ते १५ रुपयांनी कमी झाले आहेत. गेल्या महिन्यात ८० रुपये गेलेला टोमॅटो आता २५ रुपयांपर्यंत घसरले आहेत.
गेल्या पंधरवड्यापासून पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घसरले आहे. प्रामुख्याने नाशिक भागात पावसामुळे भाजीपाला शेतातच कुजत आहे. यामुळे बाजारातील आवक कमी झाली आहे. भुसावळ शहरासह विभागात नाशिक, औरंगाबाद व विदर्भातून भाजीपाला येतो. मात्र, आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. सध्या केवळ जळगाव, भुसावळ, रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड परिसरातील भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. वांगी, टोमॅटो, गंगाफळाचे दर कमी झाले. पण, भेंडी, गवार, चवळी, कारले, वालाच्या शेंगा आदींचे दर प्रतीकिलो २० रुपयांनी वाढले आहेत. गेल्या आठवड्यात बटाटे २० रुपये किलो होते, ते सध्या १० रुपये किलोने वाढून ३० रुपयांवर पोहोचले आहेत. यामुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे.
बाजारात चिखल, अस्वच्छता वाढली
शहरातील डेली भाजी मार्केटमध्ये आधीच अस्वच्छतेचा त्रास आहे. त्यात आता पावसामुळे या भागातील रस्ते व अंतर्गंत भागात देखील चिखल होतो. याचा विक्रेते व ग्राहकांना त्रास होतो. हीच स्थिती दर रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात असते. विक्रेत्यांना रस्त्यावरील चिखला दुकाने लावावी लागतात. पालिकेने किमान मुरुम व खडीचा कच टाकावा अशी मागणी आहे.
मटर शेंगा १३० किलो दर
हिवाळ्यामध्ये वाटाणे म्हणजे मटर शेंगांची आवक होते. यावेळी वटाणा शेंगाचे दर २५ ते ३० रुपये होतात. मात्र सध्या बाजारात ऑफ सिझनमध्ये वटाण्याच्या शेंगा आल्या आहेत. सध्या वटाणे शेंगांचे दर १३० ते १४० रुपये किलो आहेत. गेल्या पंधरवड्यात ६० रुपये असलेले आले आता ८० रुपये किलोवर पोहोचल्याची माहिती विक्रेते संदीप मंदवाडे यांनी दिली.
असे आहेत प्रतिकिलो दर
प्रकार पंधरवड्यापूर्वी सध्याचे दर
मेथी ६० ८०
हिरवी मिरची ८० ४० ते ६०
भेंडी ६० ८०
चवळी शेंगा ३० ते ४० ६५ ते ८०
टोमॅटो ८० २५
गिलके ६० ८०
दोडके ६० ८०
गवार ६५ ८०
कांदा पात २०० ५० ते ६०
गंगाफळ ६० ३० ते ३५
बटाटे २० ३०
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.