आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील श्री स्वामीनारायण परम धाम मंदिरामध्ये अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सामूहिकरीत्या पितृपूजन व घागर भरणीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात २४५ घागरी सामूहिकपणे भरण्यात आल्या. पंचक्रोशीसह राज्यातील विविध भागातील भाविकांच्या पितरांचे पूजन विधिवत करण्यात आले.
शहरातील भुसावळ रस्त्यावरील श्री स्वामीनारायण परम धाम मंदिरात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पंचक्रोशी तसेच नाशिक, पुणे, मुंबई या शहरांमध्ये वास्तव्याला असलेल्या हरि भक्तांच्या पितृजनांचा सामूहिक कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये १५४ पितृ जन आणि उर्वरित अज्ञात पितृ जन अशा एकुण २४५ घागरी भरण्यात आल्या. या कार्यक्रमाची प्रेरणा राजेंद्रप्रसाद दास महाराज यांच्याकडून प्राप्त झाली. मंदिरामध्ये स्वामी धर्मप्रसाददास, स्वामी मुक्तदर्शनदास, ज्ञानेश्वर भगत यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. संपूर्ण धार्मिक विधी पार पाडण्यासाठी महेश महाराज उपस्थित होते.
सुधाकर फेगडे, पुरुषोत्तम भारंबे, योगेश पाटील, बाल गोपाळ धून मंडळाने सहकार्य केले. दरम्यान, अक्षय्य तृतीयेला पितृपूजनावेळी घागर भरण्याची प्रथा खान्देशात पाळली जाते. मात्र, यावेळी एखाद्या कुटुंबात काही अडचणी निर्माण झाल्यास हा विधी करता येत नाही. अनेकवेळा मोठ्या शहरातील कुटुंबांना देखील हा कार्यक्रम घेणे शक्य होत नाही. त्यामुळे श्रीस्वामी नारायण मंदिराने पुढाकार घेऊन सामूहिक पितृपूजन व घागरी भरण्याचा कार्यक्रम घेतला. यामुळे संबंधित कुटुंबांचा भार कमी झाल्याचे मंदिराचे कोठारी स्वामी धर्मप्रसाददास महाराजांनी सांगितले.
घागरींनी भरले मंदिर... धार्मिक विधीसाठी मंदिराच्या गाभाऱ्यात २४५ घागरी विधिवत भरण्यात आल्या. यानंतर सामूहिकरीत्या पूजन करण्यात आले. ज्या ज्या भाविकांचे पितृ नोंदवले होते त्यांचे नामस्मरण करत ही पूजा संपन्न झाली. शहरातील भाविकांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.