आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहॉटसिटी भुसावळचे तापमान बुधवारी तब्बल ४२.९ अंशांवर पोहोचल्याची नोंद केंद्रीय जल आयोग कार्यालयात झाली. या तीव्र तापमानामुळे गांधी पुतळा भागातील रस्त्यांवरील डांबर खडीची पकड सोडून बाहेर पृष्ठभागावर आले. यामुळे रस्ता निसरडा होऊन वाहन घसरून अपघाताचा धोका वाढला.
सौराष्ट, कच्छमध्ये वाढलेले तापमान आणि उत्तर कोकणात जमिनीलगत वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात भुसावळच्या तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. विशेष म्हणजे सोमवारी (दि.१४) भुसावळ शहराचे कमाल तापमान ३९.७ अंशांवर होते. केवळ दोन दिवसांत त्यात ३.२ अंशांची वाढ झाली. बुधवारी केंद्रीय जल आयोगाच्याकार्यालयाने शहरात ४२.९ अंश तापमानाची नोंद केली. येत्या दोन दिवसांत तापमान ४४ अंशांचा पारा ओलांडेल, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
दिव्य मराठी एक्सप्लेनर
विनय बढे, सिव्हिल इंजिनिअर, भुसावळ
का बाहेर येते रस्त्यांवर डांबर?
रस्त्याचे डांबरीकरण करताना लिक्विड फोममधील डांबर खडीसोबत बाईंडिंग करण्यासाठी १७० डिग्री तापमानात गरम केले जाते. हे डांबर थंड झाल्यानंतर खडी सोबत पकड मजबूत होते. मात्र, ज्या ठिकाणी चुकीने अधिक प्रमाणात डांबर टाकले गेले किंवा खडी योग्य ग्रेडची नसेल, मातीचे प्रमाण जास्त असेल तेथे उन्हाळ्यात साधारण ४१ अंशांपेक्षा जास्त तापमान वाढल्यास डांबर रस्त्याच्या पृष्ठभागावर येते.
समस्या आल्यास अशी करा उपाययोजना
तापमान वाढल्यास अनेकवेळा डांबरीकरण झालेल्या रस्त्यावरील डांबर बाहेर येते. अशावेळी वाहने घसरू शकतात. अशा ठिकाणी खडीचा बारीक कच टाकून त्यावर रोडरोलर फिरवावे. यामुळे खडी आणि बाहेर आलेले डांबर एकजिव होते. रस्त्यावरील निसरडेपणा कमी होऊन अपघातासारख्या गंभीर घटना टाळता येतील.
उन्हाळा ‘ताप’दायक, पालिका रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरु
भुसावळ । शहराच्या तापमानाने मार्च महिन्यातच चाळिशी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या आरोग्य विभागाने संत गाडगेबाबा रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू केला आहे. सोबतच पाचही उपकेंद्रांसाठी औषधी उपलब्ध करुन दिली आहे. शहरातील यापूर्वीच्या तापमानाची स्थिती पाहता यंदा उन्हाळा अधिक ‘ताप’दायक ठरण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे भुसावळात रेल्वे, आयुध निर्माणी, दीपनगर वीज केंद्रामुळे कामगारांची संख्या जास्त आहे. एमआयडीसी, शेकडो वीटभट्टी उद्योग आहेत. उन्हाळ्यात बांधकामांना वेग येतो. या सर्व ठिकाणचे मजूर, कामगारांना उष्माघाताचा धोका होऊ शकतो. त्यांच्यावर उपचार करता यावे यासाठी उष्माघात कक्ष तयार केला आहे. पुढील आठवड्यात तेथे कुलर उपलब्ध होईल, असे पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधि
कारी डॉ.कीर्ती फलटणकर यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.