आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर महाराष्ट्रात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४.३ अंश तापमानाची नोंद भुसावळात झाली. संपूर्ण राज्यात उन्हाची तीव्रता अधिक आहे मात्र इतर भागाच्या तुलनेत भुसावळचे तापमान सरासरी एक ते दीड अंश जास्त आहे. हा ग्लोबल सोबतच ‘लोकल वाॅर्मिंग’चा परिणाम आहे. दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या चिमणीतून निघणारे फ्लू गॅसेस, कूलिंग टॉवरमधून बाहेर पडणाऱ्या उष्णता तसेच तापी नदीचे विस्तीर्ण खडकाळ पात्र, रेल्वेचे यार्ड व महामार्ग चौपदरीकरणात झालेली वृक्षतोडीमुळे इतरांच्या तुलनेत भुसावळात एक ते दीड अंश तापमान जास्त असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भुसावळमधील आतापर्यंतचे सर्वाधिक ४८ अंश तापमान १७ मे २०१६ रोजी शहरातील केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयात नोंदवले गेले आहे. मार्च महिन्यात भुसावळ शहराचे सरासरी तापमान चाळिशीच्या आत असते. एप्रिलमध्ये पारा ४१ ते ४३ अंशांदरम्यान तर मे महिन्यात पारा ४३ अंशांवर जातो. यंदा मात्र मार्चमध्ये तापमानाने चाळिशी गाठली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ते ४४.३ अंशांपर्यंत पोहोचले. त्यामुळे २०१६ च्या उच्चांकी तापमानाचा रेकॉर्ड एप्रिल मध्येच मोडला जाईल काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.
काेळसा जाळणे, डांबरीकरण, सिमेंटचे जंगल तापमानवाढीची कारणे 1 दीपनगर औष्णिक केंद्रात वीजनिर्मितीसाठी दररोज किमान ३६०० हजार टन कोळसा जाळला जातो. यातून निर्माण होणाऱ्या उष्णतेपैकी केवळ ६० टक्के उष्णता प्रत्यक्षात वीजनिर्मितीसाठी वापरली जाते. उर्वरित ४० टक्के उष्णता व प्रदूषणकारी वायू कुलिंग टॉवर, चिमणीतून उत्सर्जित होतात.
2 तापीचे पात्र सुमारे ८५० मीटर रुंद आहे. संपूर्ण नदीपात्रात कुठेही वाळू नसून बेसॉल्ट खडक आहे. उन्हाळ्यात पाणी आटल्याने हे खडक लवकर तापून उशिराने थंड होतात. तापलेल्या खडकांच्या मोठ्या पृष्ठभागामुळे उष्णतेचे प्रमाण वाढते. शिवाय वृक्षांची संख्या तोकडी आहे.
3 विस्तीर्ण रेल्वे यार्ड हे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे आहे. तेथील लोखंडी रुळांचे जाळे, दिवसभरात शेकडो मालगाड्यांची ये-जा असते. उन्हाळ्यात हे लोखंड तापून वातावरणात उष्णता उत्सर्जित होते. यार्डात अनेक ठिकाणी रस्ते काँक्रिटीकरणाचे केले आहेत.
4 शेकडो वृक्षांची कत्तल महामार्गाच्या चौपदरीकरणात झाली. या तुलनेत एकही नवीन झाड जगवले नाही. उन्हाळ्यात डांबरी रस्ते तापतात. सोबतच शहरात डांबरीकरण, पेव्हरब्लॉक, काँक्रिटीकरण व सिमेंटच्या इमारती देखील भुसावळचे तापमान वाढीस कारणीभूत आहेत.
एक्स्पर्ट आेपिनियन कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड हे वायू सूर्याकडून येणारी उष्णता धरून ठेवतात. औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचa्या परिसरात अशा प्रकारचे अनेक वायू चिमणी व कूलिंग टॉवरमधून वातावरणात सोडले जातात.
मुळातच वातावरणात अधिक प्रमाणात वाढलेल्या कार्बन डायऑक्साइड सोबत औष्णिक केंद्रातून निघणाऱ्या वायूंमुळे प्रमाण दुपटीने वाढते. परिणामी सूर्याची उष्णता धरून ठेवण्याचे प्रमाण वाढून इतर भागांच्या तुलनेत तापमान दीड ते दोन अंशांनी वाढते.
वातावरणातील कार्बन डायऑक्साइड वायू झाडे त्यांची पाने, मुळे, बुंध्यात साठवतात. झाडांचे प्रमाण जास्त असेल तर वातावरणातील हा वायू कमी होऊन उष्णतेपासून बचाव होतो. यामुळेच औष्णिक केंद्र परिसरात जास्त वृक्षलागवड अपेक्षित असते. डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ, पुणे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.