आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविशेष रस्ता अनुदानातून मुदतीत काम न केल्याने मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी ठेकेदाराला ब्लॅक लिस्टेड केले होते. यानंतर न्यायालयापर्यंत वाद गेलेल्या शहरातील १२ कोटींच्या बहुप्रतीक्षित व आठ महिन्यांपासून रखडलेल्या रस्ते कामांना मंगळवारी मुहूर्त गवसला. बद्री प्लॉट परिसरातून या कामाला सुरुवात झाली. या कामांसाठी पालिकेने ३१ ऑक्टोबरची मुदत दिली आहे. मात्र, ठेकेदाराने ती अमान्य करत शासन नियमानुसार ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदत मागितली आहे. दुसरीकडे पाऊस झाल्यास सुरू झालेली कामे थांबतील. त्यामुळे भुसावळकरांना पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यांचा त्रास होईल.
पालिकेने विशेष रस्ता अनुदान योजनेंतर्गत २३ कामांची सुमारे १२ कोटी रुपयांचे कंत्राट मे. विनय सोनू बढे अँड कंपनीने घेतले होते. या कामासाठी ऑगस्ट २०२० मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आला. त्यात निधी खर्च करण्याची मुदत २८ मार्च २०२२ पर्यंत होती. ही मुदत संपल्याने ठेकेदारास २१ मार्च रोजी ब्लॅक लिस्टेड करण्याची कारवाई मुख्याधिकाऱ्यांनी केली होती. त्या विरूद्ध ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतली. तेथे ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा अधिकार मुख्याधिकाऱ्यांना नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. या सर्व प्रक्रियेनंतर ठेकेदार व पालिकेत समझोता होऊन आठ महिन्यांपासून रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना मंगळवारपासून सुरुवात झाली. मात्र, पावसाला सुरूवात झाल्यास डांबरीकरण कशा गुणवत्तेचे होईल? हा प्रश्न आहे. दरम्यान, पालिकेने या कामांसाठी ठेकेदाराला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. मात्र, ठेकेदाराने विशेष रस्ता अनुदान निधीसाठी शासनाने ३१ मार्च २०२३ पर्यंतच्या मुदतीत काम पूर्ण करण्याची अनुमती मागितली आहे.
हरकत दुर्लक्षित, प्रभाग २०चा ब्लॉक २५ ऐवजी.....
हनुमान नगर भाग वगळून प्रभाग २५ ला जोडावा अशी मागणी दिनेश नेमाडे यांनी हरकती द्वारे केली होती. प्राप्त माहितीनुसार मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व पुढे सुनावणीत जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मक खुलासा दिला होता. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग २० मधील हा ब्लॉक वगळून २५ ऐवजी शेजारील प्रभाग २१ला जोडला. अंतीम प्रभाग रचना अद्याप जाहीर झाली नसली तरी ही अधिकृत माहिती ‘दिव्य मराठी’च्या हाती आली. या प्रकरणी आपण न्यायालयात दाद मागू, अशी भूमिका राष्ट्रवादीचे पदाधिकारी दिनेश नेमाडे यांनी घेतली आहे.
तर रस्ते पुन्हा रेंगाळतील
विशेष रस्ता अनुदानातील तिन्ही निविदांच्या अंदाजपत्रकात राहिलेल्या बाबी म्हणजेच टॅक कोट व खडीचा दृढ थर देण्याबाबतची स्वतंत्र निविदा काढावी, असे पत्र पालिका नगर अभियंत्यांनी १९ एप्रिल २०२१ रोजी मुख्याधिकाऱ्यांना दिले. यावर मुख्याधिकाऱ्यांनी त्याच दिवशी नगरअभियंत्यांना ई-निविदा प्रसिद्ध करुन मंजुरी करता प्रस्ताव अध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आदेश दिले. मात्र, ही निविदा प्रसिद्ध झालेली नाही. यापुढील काळात ही प्रक्रिया न झाल्यास अमृत पाइपलाइनमुळे खोदकाम झालेले रस्ते पुन्हा रेंगाळतील.
मुंबईतील बैठक यशस्वी
शहरातील रस्त्यांचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुंबईत पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व ठेकेदार रजत बढे यांच्यासोबत ३० मे रोजी बैठक घेतली. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ठेकेदाराची देयके अदा करावी, असा निर्णय तेथे झाला. त्यानुसार देयके अदा होताच ठेकेदाराने काम सुरु केले.
जाणून घ्या कुठे होतील रस्ते, मुदतीत काम पूर्ण झाल्यास मिळेल दिलासा
येथे होईल कारपेट : जेतवन रिक्षा स्टॉप ते ध्यान केंद्र, मैनाबाई नगर, प्रभाग क्रमांक ७, भुसावळ हायस्कूल परिसर, विठ्ठल मंदिर वॉर्ड, शिवाजी नगर, प्रभाग क्रमांक १४ मिल्लत नगर परिसर, पाटील मळा परिसर, हॉटेल अनिल, ब्राह्मण संघाचा मुख्य रस्ता, न्यू एरिया वॉर्ड, गांधी चौकी ते स्टेशन रोड, डॉ. आंबेडकर पुतळा भाग, गडकरी नगरचा काही भाग.
येथे नवीन सुरुवात : दत्त नगर परिसर, हुडको कॉलनी, गुंजाळ कॉलनी, देविदास फालक नगर, शुंभराजे नगर, दीनदयाळ नगर, रानातला महादेव मंदिर परिसर, सिंधी कॉलनी भाग, आनंद नगर भाग, गोविंद कॉलनी, बंब कॉलनी, बियाणी हायस्कूल भाग, प्रोफेसर कॉलनी, मोहंमदी नगर, रॉकेल डेपो भाग, महेश नगर, नाहाटा कॉलेज मागील भाग आदी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.