आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहसूल विभागातर्फे अवैध गाैणखनिज वाहतूक रोखण्यासाठी कारवाई केली जाते. मात्र, तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केलेल्या डंपरची चोरी होण्याचे प्रकार वाढले आहे. या माध्यमातून वाळू तस्करांनी जणू यंत्रणेला आव्हानच दिले आहे. भुसावळ येथेही तीन महिन्यांत तहसीलच्या आवारातून तीन डंपरची चोरी झाली.
भुसावळ तहसीलदार दीपक धिवरे यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाचे पथक अवैध गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करते. या कारवाईत पकडलेली वाहने तहसील कार्यालयात जमा केली जातात. संबंधित चालकांना दंड भरण्याची नाेटीस बजावली जाते.
मात्र, या नाेटीसला केराची टाेपली दाखवत गौणखनिज तस्करांची मजल तहसील कार्यालयाच्या आवारातील डंपर पळवण्यापर्यंत गेली आहे. भुसावळ येथे ८ जुलै २०२२ रोजी सुनसगाव रस्त्यावर पकडलेले डंपर (एमपी.३३-एच.१३२९) १३ आॅक्टाेबर २०२२ रोजी चाेरून नेण्यात आले. याप्रकरणी शहर पाेलिसांत गुन्हा दाखल झाला. यानंतर १ नाेव्हेंबर २०२२ रोजी साकेगाव येथे मनाेज सुरेश भागवत यांचे डंपर (एमएच.१९-झेड.६३६३) २३ नाेव्हेंबरला पळवून नेण्यात आले. ७ डिसेंबर रोजी राहूल भाेई यांचे डंपर (एमएच.१९-झेड.४८४७) पकडले हाेते. मात्र, हे डंपर १० डिसेंबर रोजी चाेरीला गेल्याचे उघड झाले.
कारवाई थांबणार नाही, उलट गुन्हे दाखल करणार
तहसील कार्यालयाच्या आवारातून डंपरची चाेरी झाल्यानंतर आम्ही रितसर गुन्हे दाखल केले. तसेच आता अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीविरूद्धची कारवाई अधिक तीव्र करणार आहोत, अशी माहिती भुसावळचे तहसीलदार दीपक धिवरे यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.