आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा प्रथमच बुधवारपासून शाळा पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहे. तत्पूर्वी, साेमवार, मंगळवार दाेन दिवस सर्व शाळांमध्ये स्वच्छता अभियान व शाळापूर्व तयारी होईल. यानंतर बुधवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी पालक संपर्क मेळावे होतील. त्यात विद्यार्थ्यांची नोंदणी, शारीरिक, बौद्धिक, सामाजिक व भावनात्मक, भाषा विकास, गणनपूर्व तयारी व पालकांना मार्गदर्शन अशा सात उपक्रमाचे स्टॉल थाटले जातील. या स्टॉलवरून मार्गदर्शनासोबत बालकांच्या कृतींच्या नोंदी विकास पत्रावर घेतल्या जातील. यामुळे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देताना मदत होईल. शिवाय शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन गणवेश व पुस्तकांचे वितरण होईल.
दोन दिवस होईल ६५ शाळांमध्ये स्वच्छता
यंदाचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होत असले तरी शाळा सोमवारीच (दि.१३) सुरु होतील. सोमवार व मंगळवारी भुसावळ तालुक्यातील ६५ शाळांची स्वच्छता होईल. शहरातील काही शाळांनी तर शनिवारपासूनच स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. रविवारी के. नारखेडे माध्यमिक विद्यालयात आवार, वर्गखोल्या, कार्यालयांची स्वच्छता सुरू होती.
पहिल्याच दिवशी गणवेश, पुस्तके... पहिली ते आठवीपर्यंतच्या मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी माध्यमाच्या ३१ हजार २७ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन पुस्तके मिळतील. त्यासाठी यापूर्वीच शाळा स्तरावर पुस्तके पाठवली आहेत. पहिल्या दिवशी पुस्तकांसोबतच गणवेश तयार असलेल्या बालकांना गणवेशाचे वितरण करण्यात येईल.
शाळांच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझरची व्यवस्था
सध्या राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासनाला खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातावर सॅनिटायझर देवून तपासणी केली जाईल. यासंदर्भात येणाऱ्या नवीन मार्गदर्शक सूचनांप्रमाणे उपाययोजना करू.
किशोर वायकोळे, गटशिक्षणाधिकारी, भुसावळ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.