आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन मिरवणूक:निर्माल्य संकलन 4 पट वाढले, 125 मूर्ती संकलित; गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्या उधळून जपला शहरात सलोखा

भुसावळ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश विसर्जनाच्या दिवशी भुसावळात तापी नदी आणि हतनूर धरण परिसरात विविध सेवाभावी संस्थांसह पालिकांनी निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवला. त्यात सुमारे ४८ टन निर्माल्य संकलित झाले. कोरोनाच्या दोन वर्षांपूर्वी म्हणजेच सन २०१९च्या तुलनेत हे प्रमाण जवळपास चार पटीने जास्त आहे. मूर्ती संकलनाला मात्र कमी प्रतिसाद मिळाला. फक्त १२५ मूर्ती संकलित झाल्या.

अनंत चतुर्दशीला डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने निर्माल्य संकलन उपक्रम राबवला. त्यात भुसावळ शहरातील तापी नदीवरील पुलाच्या चारही बाजूने, हतनूर धरणाजवळ १७५ श्री सदस्यांद्वारे ८,१५१ घरगुती गणेश मंडळांकडून निर्माल्य संकलन करण्यात आले. यामुळे यंदाच्या उत्सवाला जल प्रदूषणमुक्ती, पर्यावरण संवर्धनाची देखील जोड मिळाली. भुसावळ शहरात तापी नदीपात्रात भोळे महाविद्यालय, नगरपालिका व साईजीवन सुपर शॉपीने त्यासाठी पुढाकार घेतला. संकलित निर्माल्य तापी काठावर खड्डा खोदून पुरण्यात आले. दरम्यान, भोळे कॉलेजमधील रासेयो एककाने तापी नदीवर निर्माल्य दानासाठी भाविकांना प्रेरित केले. कार्यक्रम अधिकारी प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबवला.

हतनूर पुलाजवळ ८ तास स्वयंसेवकांची सेवा वरणगाव, तांदलवाडी । अनंत चतुर्दशीच्या दिवशी वरणगाव, टहाकळी, सावदा, फैजपूर, तांदलवाडीसह अनेक शहरे, खेड्यापाड्यातील सार्वजनिक मंडळे, घरगुती गणपतीच्या मूर्ती हतनूर धरणासमोरील पुलाच्या दोन्ही बाजूने विसर्जित करतात. मात्र, पीओपीच्या मूर्ती आणि निर्माल्य नदीत टाकल्याने जलप्रदूषण होते. त्यास काही अंशी आळा घालण्यासाठी प्रशासनासह सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. वरणगाव पोलिसांनी टहाकळी व हतनूर फाट्यानजीक बंदोबस्त ठेऊन गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना निर्माल्य व गणेशमूर्ती चातक संस्था, सिव्हील सोसायटी, डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, वरणगाव पालिकेकडे देऊन राबवलेल्या उपक्रमास सहकार्याचे आवाहन केले. शासकीय कर्मचारी व स्वयंसेवकांनी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत १० तासांत निर्माल्य संकलित केले. गणेशमूर्ती संकलनास मात्र कमी प्रतिसाद मिळाला. सुमारे १२५ गणेशमूर्ती संकलित झाल्या, असे सांगण्यात आले.

जलप्रदूषणाबाबत प्रबोधन, खत तयार करणार
पीओपीच्या मूर्ती, निर्माल्य, प्लास्टिक पिशव्या नदीत टाकल्याने होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती स्वयंसेवकांनी गणेशभक्तांना दिली. नंतर निर्माल्य संकलन करुन प्लास्टिक, नारळ, हार, फुले तसेच जुन्या मूर्ती वेगवेगळे करुन त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल. फुलांचे विघटन करुन गांडूळ खत प्रकल्पासाठी वापरात आणू असे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...