आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळात तेरावा महिना:मुख्य जलवाहिनीला भगदाड पाणीपुरवठा एक दिवस विलंबाने; दुरुस्ती पूर्ण झाल्यास आज होईल पाणीपुरवठा

भुसावळ15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पाणीपुरवठ्यासाठी तापी नदीतील बंधाऱ्यातून पाण्याची उचल केली जाते. मात्र, याच रॉ वॉटर वाहिनीला रेल्वे कॉलनी परिसरात मोठे भगदाड पडल्याने मंगळवारी रात्री १०.३० वाजता हजारो लिटर पाणी वाया गेले. परिणामी रात्रीपासूनच शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला. या गळतीची दुरुस्ती होईपर्यंत विविध भागात रोटेशन पद्धतीने होणारा पाणीपुरवठा दोन दिवस लांबला. म्हणजेच भुसावळ-करांना आठ दिवसांआड मिळणारे पाणी आता रोटेशन पूर्ण होईपर्यंत ९ ते १० दिवसांआड मिळेल.

तापी नदीतील बंधाऱ्यातून पाणी उचल करण्यासाठी पालिकेने मुख्य जलवाहिनी (मेन रायझिंग) टाकली आहे. मात्र, सुमारे ४० वर्षांपेक्षा जुनी ही जलवाहिनी जीर्ण झाली आहे. या ५०० मी मी व्यासाच्या जलवाहिनीला वारंवार गळती लागते. मंगळवारी रात्री १०.३० वाजता रेल्वे कॉलनी परिसरात रॉ वॉटर वाहून नेणाऱ्या मुख्य जलवाहिनीला मोठे भगदाड पडले. यामुळे पाण्याची गळती सुरू होत शहरात होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला. ही माहिती मिळताच पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सतीश देशमुख यांनी घटनास्थळ गाठले. दरम्यान, जलवाहिनीला गळती लागली तेव्हा शिवाजी नगर भागात पाणीपुरवठा सुरू होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी जलवाहिनी फुटलेली असताना देखील पाण्याची उचल करून पाणी जलकुंभापर्यंत पोहोचवले. मात्र, अपेक्षित दाब नव्हता. त्यामुळे शिवाजी नगर व परिसरात रात्री झालेला पाणीपुरवठा कमी दाबाने झाला. बुधवारी सकाळी रोटेशन नुसार नियोजित पाणीपुर‌वठा मात्र पूर्णपणे ठप्प झाला.यामुळे ऐन मे महिन्यात दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती निर्माण झाली.

आज या भागात मिळणार नाही पाणी : जहवाहिनी फुटल्याचा फटका पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाला बसला. त्यामुळे गुरुवारी नियोजनानुसार पंचशील नगर, अष्टभुजा देवी मंदिर परिसर, दीनदयाल नगर, जामनेर रोड या भागाला देखील पाणी मिळणार नाही. दुरुस्ती होईपर्यंत एक किंवा दोन दिवस या भागातील रोटेशन पुढे ढकलले जाईल. आठऐवजी नऊ ते दहा दिवसांनी पाणी मिळेल.

बुधवारी या भागातील पाणीपुरवठा बंद
मंगळवारी रात्री जलवाहिनीला गळती लागल्याने बुधवारी सकाळपासून शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला. रोटेशननुसार बुधवारी सहकार नगर, शारदा नगर, शांती नगर, वसंत टॉकीज परिसर, श्रीराम नगर, वांजोळा रोड, दत्त नगर, कुळकर्णी प्लॉट, गवळी वाडा आदी भागात पाणीपुरवठा नियोजित होता. पण, रहिवाशांचा अपेक्षाभंग झाला.

युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू
तांत्रिक अडचणींमुळे मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शहरातील पाणीपुरवठा बंद पडला. यामुळे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा अभियंता सतीश देशमुख यांनी कर्मचाऱ्यांनासाेबत घेऊन जलवाहिनीची गळती दुरुस्तीचे काम हाती घेतले. सर्वात आधी पाणी बंद करून फुटलेल्या पाइपची वेल्डिंग सुरू केली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...