आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इनसाइट:भुसावळात पकडलेल्या दहा टन तांदळाचे पारोळा कनेक्शन उघड

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाजारपेठ पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी १० टन तांदूळ असलेला ट्रक पकडला हाेता. हा तांदूळ रेशनचा आहे का? याबाबत महसूल विभागाने बोटचेपी भूमिका घेतली. यामुळे त्यांच्या अहवालाची वाट न पाहता पोलिसांनी स्वत: फिर्यादी होत ट्रक चालकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे चालकाला मका घेऊन पारोळा जायचे आहे, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात ट्रकमध्ये तांदूळ भरल्याचे उघडकीस आला. हा तांदूळ रेशनचाच आहे असा पोलिसांचा कयास आहे.

रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याच्या माहितीवरून बाजारपेठ पोलिसांनी शहरातील हिरा हॉलजवळून तांदळाच्या गोण्यांनी भरलेला ट्रक (एमएच.१९.सीवाय.१५१४) सोमवारी (दि.२२) रात्री ११ वाजता ताब्यात घेतला होता. ट्रकमधील तांदुळ रेशनचा आहे किंवा नाही? याबाबत पोलिसांनी पुरवठा विभागाला पत्र देत अहवाल मागवला होता. मात्र, पुरवठा विभागाने तांदूळ रेशनचा आहे किंवा नाही? हे सांगता येत नाही, असे मोघम उत्तर देणारे पत्र पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांना दिले.

अहवालाची वाट पाहणार नाही
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे गुरुवारी भुसावळात आले होते. पोलिसांनी पकडलेल्या तांदुळाबाबत त्यांना विचारले असता, रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांची गय होणार नाही. यापुढे अशा कोणत्याही प्रकरणात महसूल विभागाने अहवाल देण्यास दिरंगाई केल्यास पोलिस स्वत: गुन्हे दाखल करतील. संबंधितांकडे आवश्यक कागदपत्रे असल्यास काळजी नाही. मात्र, धान्य अवैध असल्यास कारवाई अटळ असल्याचे सांगितले.

रॅकेटचा शोध घेणार : पोलिस निरीक्षक
रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्री करणारे रॅकेट सक्रिय आहे का? याचा शाेध घेऊ. पकडलेल्या तांदुळाच्या प्रकरणात आमचे पोलिस फिर्यादी झाले आहेत. या प्रकरणाचा छडा लावला जाईल, असे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी सांगितले.

पूर्वनियाेजित प्रकार, चालक अनभिज्ञ
संबंधितांनी ट्रक चालकाला मका पाराेळा येथे न्यायचा आहे, असे सांगितले. प्रत्यक्षात ट्रकमध्ये तांदुळ भरला. म्हणजेच संबंधितांकडे हा तांदुळ आधीपासूनच उपलब्ध हाेता. या प्रकाराबाबत पोलिस प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देणार आहे.

बातम्या आणखी आहेत...