आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात नवीन कॉलन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र कर भरणाऱ्या नागरिकांना सुविधा पुरवण्यास दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील नर्मदानगर, गोविंदनगर, विमल पाटील नगर, माणकबाग, इंद्रप्रस्थ नगर आदी कॉलन्यांमध्ये गटारी, पथदिव्यांची सुविधा नाही. गटारींअभावी रस्त्यावर सांडपाणी साचते. परिसरातील नागरिकांनी शोषखड्डे तयार केले आहेत. मात्र, काही ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. तर सांडपाणी रस्त्यावर साचून चिखल होतो.
दिवसेंदिवस शहराची व्याप्ती वाढत आहे, पालिकेच्या हद्दीतच नवीन नवीन कॉलन्या, वसाहती अस्तित्वात येत आहेत. पालिकेच्या हद्दीत असल्याने तेथील रहिवाशांना कर द्यावा लागतो. मात्र करापोटी पालिकेकडून सुविधा मात्र नागरिकांना मिळत नाहीत. त्यामुळे वारंवार पालिकेकडे अर्ज करून, प्रत्यक्ष भेटून समस्या मांडल्यावरही दुर्लक्ष केले जाते. यामुळे नागरिकांकडून पालिकेच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. हल्ली पालिकेवर प्रशासकराज असून या कार्यकाळात तरी नागरिकांना सुविधा मिळतील अशी आशा होती. मात्र, नागरिकांची अपेक्षा फोल ठरली आहे. प्रशासकांच्या कार्यकाळातही शहरातील असुविधांची स्थिती जैसे थे आहे. त्यामुळे नगरसेवकांचा काळ आणि प्रशासकांचा काळ सारखाच असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. पावसाळ्याचा काळ असल्याने, पालिकेने डासप्रतिबंधक उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नगरसेवकांनीही दखल घ्यावी.
आरोग्याचा प्रश्न गंभीर
नवीन वसाहती, कॉलन्यांमध्ये गटारी नसल्याने सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी परिसरातील नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सांडपाणी जिरवण्यासाठी परिसरातील रहिवाशांनी आपल्या घराजवळ शोष खड्डे केले आहे. मात्र, शोषखड्ड्यांमध्ये दीर्घकाळ पाणी मुरल्याने आता त्यात पाणी साचून राहते. परिणामी डासांचा उपद्रव वाढून दुर्गंधी पसरते. तापाच्या रूग्णांचे प्रमाण वाढले.
पाण्याचे साचले डबके
नवीन कॉलन्यांमध्ये सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था नसल्याने अनेक ठिकाणी डबकी साचली आहेत. काही ठीकाणी पाणी जमीनीत पाझरले जाते. तर काही ठिकाणी पाण्याचे मोठे डबके तयार होते. नर्मदानगर भागात ही समस्या अधिक उग्र बनली आहे. आगामी काळात पाऊस झाल्यानंतर त्यात डासांची उत्पत्ती वाढून, डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांचा फैलाव होण्याची भीती आहे.
पोस्टाने पाठवले निवेदन
गेल्या ११ वर्षांपासून लक्ष्मी पांडुरंग अपार्टमेंट येथे राहतो. या भागात गटारी, पथदिवे नाहीत. वारंवार पालिकेकडे तक्रारी करून, निवेदन देऊन काहीही उपयोग होत नाही. त्यासाठी पालिकेला रजिस्टर पोस्टाने निवेदन पाठवत आहे. मात्र पालिकेकडून दखल घेतली जात नाही. पालिकेला कर भरून काहीही सुविधा मिळत नाही. दरवर्षी न चुकता पालिकेकडून करमागणी पत्रके दिली जातात. त्यासोबत सोयीसुविधा पुरवण्याचेही नियोजन पालिकेने करणे गरजेचे आहे.
- किरण इंगळे, ओमकार कॉलनी, भुसावळ
प्राथमिक सुविधा नाहीत
परिसरात गटारीच नसल्याने पालिकेकडे निवेदन दिले. तक्रारी केल्या मात्र काहीही उपयोग झाला नाही. प्रशासकाच्या काळात नागरिकांना सुविधा मिळतील असे वाटत होते, मात्र अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कायम आहे. रस्ते, गटारी, पथदिवे, पाणी या प्राथमिक सुविधा देण्यास पालिका प्रशासन असमर्थ दिसत आहे. त्यामुळे पालिकेच्या कामकाजाबद्दल तीव्र नाराजी आहे.
- केशव झांबरे, नर्मदा नगर, निवृत्त केंद्रप्रमुख
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.