आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्यथा कारवाई:शहरात शांततेसाठी सर्व समाजांचे सहकार्य हवे, तरुणांनाही तंबी द्या; बैठकीत अधिकाऱ्यांचा इशारा

यावल20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण होईल व धार्मिक भावना दुखावतील, अशा पद्धतीची पोस्ट टाकल्याने शहरात मंगळवारी तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर येथील पोलिस ठाण्यात सायंकाळी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. त्यात सर्वधर्मीय बांधवांकडून शांततेची अपेक्षा पोलिसांनी व्यक्त करत तरुणांना सोशल मीडियाचा वापर करताना भान बाळगावे, आपल्या हातून धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेतली गेली पाहिजे. तसेच जर कोणाच्या हातून हेतुपुरस्सर धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, अशा सक्त सूचना या बैठकीत येथील पोलिस निरीक्षक आशित कांबळे यांनी दिल्या.

नुपूर शर्मा यांच्या संदर्भात समर्थन देणारी एक पोस्ट शहरातील एका तरुणाने व्हायरल केल्याने धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. यासंदर्भात शहरातील सुदर्शन चौकामध्ये काही काळ तणावही निर्माण झाला होता. त्यामुळे शहरात शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने येथील पोलिस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी शांतता समितीची बैठक बोलावण्यात आली. बैठकीत पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक कांबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद गोसावी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सर्व समाजाकडून शांतता राखण्याची अपेक्षा आहे. तरुणांच्या हातून कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीची पोस्ट टाकली जाऊ नये, ज्येष्ठांनी त्यासाठी त्यांचे प्रबोधन करावे, अशा सूचना देण्यात आल्या. या वेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, भाजप तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष डॉ.नीलेश गडे, मनसेचे चेतन अढळकर, अमोल भिरूड, हाजी गफ्फार शाह, हाजी इक्बाल खान, हबीब मंजर, भूषण फेगडे, बाळू फेगडे, शरद कोळी, पप्पू जोशी, संतोष खर्चे, गोपालसिंग पाटील, नईम शेख, नितीन सोनार, समीर खान, शेख कलीम, शेख जाकीर आदी उपस्थित होते.

पदाधिकाऱ्यांनी सूचना करत टोचले तरुणांचे कान
समाजातील ज्येष्ठांनी तरुणांमध्ये संस्कार करणे गरजेचे आहे. परस्पर धर्माचा आदर हा झाला पाहिजे. कोणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. येणाऱ्या पिढीला खऱ्या अर्थाने प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे हाजी शब्बीर खान मोहम्मद खान यांनी सांगितले. तर सोशल मीडियावर तरुण चुकीचे मेसेज टाकतात. त्यामुळे तरुणांना व्यवस्थित समज देणे गरजेचे आहे. त्यांना व्यवस्थित समजून सांगत त्यांचे भविष्य खराब होवू नये यासाठी पुढाकार घेत चांगले-वाईट काय ते सांगावे, असे प्रा.मुकेश येवले यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...