आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात सर्व शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात व मिठाई वाटून स्वागत झाले. पहिलाच दिवस असल्याने वैयक्तिक परिचय, मागील वर्गातील उजळणी घेऊन हसतखेळत शिक्षणावर भर देण्यात आला. दरम्यान, बहुतांश शाळांमध्ये पुस्तकांचे वाटप झाले. गणवेश मात्र कुठेही मिळाले नाही. तालुक्यात जि.प. शाळांमधील विद्यार्थी संख्या ६,९८५ आहे. त्यात पहिलीत दाखल सुमारे ८६२ पैकी बुधवारी ५४३ विद्यार्थी हजर होते. संपर्क मेळाव्यांसाठी ८८९ पालकांनी हजेरी लावली. तर १६७ शिक्षक, ११७ अंगणवाडी सेविका आणि ३३६ लोकप्रतिनिधींनी विविध शाळांमध्ये उपस्थित देत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
बोदवड येथील न.ह.रांका हायस्कूलमध्ये दोन हजार विद्यार्थी उपस्थित होते. ढोलताशांच्या गजरात व रस्त्यावर गालीचा अंथरून, फुलांची व रांगोळ्यांची सजावट करून त्यांचे स्वागत झाले. संस्थेचे सर्व पदाधिकारी व नगराध्यक्ष आनंदा पाटील यांच्यासह पालकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन विद्यार्थिनी मृणल जैन व आकांक्षा पाटील यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना शिरा देऊन तोंड गोड करण्यात आले. बोदवड येथील जि.प.मराठी मुलींची शाळा क्रमांक २ मध्ये पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थिनींचे स्वागत झाले. शाळापूर्व तयारी मेळाव्यास प्रतिसाद मिळाला. पालकांचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. विद्यार्थ्यांना मिठाई देण्यात आली.
मुख्याध्यापक मालती तायडे, रेखा बेरागी, संगीता शेळके, पूनम वाघोदे, मंगेश तिडके व पालक उपस्थित होते. बरडिया शाळेत पहिलीत दाखल विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका रंजना काठोके, प्रगती बालवाडीच्या मुख्याध्यापिका सुनीता पाटील यांनी स्वागत केले. मध्यान्ह भोजनात जिलेबी वाटण्यात आली. वराड येथे सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. केंद्र शाळा शेलवड येथे बीडीओ हेमंतकुमार काठेपुरी यांनी भेट देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक-२ पार पडला. मुख्याध्यापक लवंगे यांनी विविध उपक्रम व बाला उपक्रमाची माहिती दिली.
पालक संपर्क अभियानातून शिक्षक व पालकांच्या समन्वयाने शाळेचा विकास कसा होऊ शकतो? यावर मंथन झाले. नंतर बीडीओंनी पालकांना संबोधित करत शाळेला मदतीचे आवाहन केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद साळुंखे, उपसरपंच रामदास माळी उपस्थित होते.
पुरेशा बसेस नाहीत
ग्रामीण भागात अजूनही पुरेशा बसेस सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी ग्रामीण विद्यार्थ्यांना खासगी वाहनांनी शाळेत यावे लागले. काही ठिकाणी महामंडळाने दोन ते तीन बसेस विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. येत्या आठ दिवसांत मानव सेवेच्या बसेस पास देऊन सुरू होतील, असे सांगण्यात आले.
पहिल्या दिवशी अभ्यासाचा ताण पडणार नाही याची खबरदारी घेतली
शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांचा नावानिशी परिचय करून घेण्यात आला. विद्यार्थ्यांना मागील वर्गातील उजळणी, पाढे, विविध इंग्रजी, मराठी व हिंदी कविता, इंग्रजीचे दैनंदिन जीवनातील वाक्यांचा सराव करून घेण्यात आला. पहिल्याच दिवशी अभ्यासाचा जास्त ताण न देता हसतखेळत वातावरण निर्मितीस प्राधान्य दिले. भास्कर लहासे, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती, बोदवड
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.