आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण अभियान:जय लेवा ग्रुपअंतर्गत वृक्षारोपण अभियान

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डातील जय लेवा ग्रुप अंतर्गत येणारे नवरत्न गणेश मंडळ व श्रीकृष्ण गणेश मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सवात सामजिक उपक्रम राबवले जातात. यंदाच्या गणेशोत्सवात या मंडळांतर्फे परिसरात १०१ वृक्षांची लागवड केली जाणार आहे. हा उपक्रम राबवण्यासोबतच मंडळाने विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी रुची वाढावी म्हणून विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले आहे.

कोरोना आपत्ती आणि शहराच्या वाढत्या तापमानामुळे येणाऱ्या अडचणींपासून बोध घेत शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा समाजहिताच्या उपक्रमांवर भर दिला आहे. असे उपक्रम प्राधान्याने राबवणाऱ्या मंडळांमध्ये विठ्ठल मंदिर वॉर्डातील जय लेवा ग्रुप अंतर्गत नवरत्न गणेश मंडळ व श्रीकृष्ण गणेश मंडळाचा समावेश होतो. गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या काळात या मंडळाच्या माध्यमातून वॉर्डात सोडीयम हायड्रोक्लोराईडची फवारणी करुन सॅनिटायझेशन करण्यात आले होते.

यासोबत गरजूंना शिधा वितरण, रेल्वे स्थानकावर अन्नदान, फराळ वितरण असे उपक्रम राबवण्यात आले. दरम्यान, शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाळ्यात तापमानाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी वृक्षारोपणाचा संकल्प केला आहे. बुधवारी (दि. ७) परिसरात १०१ झाडांची लागवड करुन त्यांचे संगोपन केले जाणार आहे. नवरत्न मंडळाचे अध्यक्ष मनीष महाजन व श्रीकृष्ण मंडळाचे अध्यक्ष भावेश इंगळे सहकार्य करत आहेत. शहरातील इतरही उत्सव मंडळे, सामाजिक संस्थांनी वृक्षलागवड करावी, असे आवाहन या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

विविध स्पर्धांचे आयोजन
कोरोनाच्या काळापासून विद्यार्थी मोबाइलचा वापर अधिक प्रमाणात करु लागले. खेळांमधील रुची कमी होत आहे. यामुळे या दोन्ही मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवात संगीत खुर्ची, चमचा लिंबू, कबड्डी, खो-खो आदींसह बौद्धिक खेळांच्या स्पर्धा घेतल्या. यातील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांची विविध खेळांमध्ये रुची वाढण्यासाठी मदत होणार आहे.

मोबाइलमुक्तीचे प्रयत्न
गणेशोत्सवातून सामाजिक कार्य करण्यावर जय लेवा ग्रुपच्या नवरत्न मंडळ व श्रीकृष्ण मंडळाचा भर आहे. यंदा वृक्षलागवड तसेच मुलांना मोबाइलपासून दूर कसे सारता येईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच माध्यमातून खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. बबलू बऱ्हाटे, अध्यक्ष, जय लेवा ग्रुप, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...