आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखेडीभोकरी ते भोकर दरम्यान तापी नदीत माती, मुरूम, पाइप टाकून तयार केलेला कच्चा रस्ता गुळी नदीला साेडलेल्या आवर्तनामुळे वाहून गेल्याने या मार्गावरील प्रवाशांसह लहान, मोठ्या वाहनधारकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे हंगामी लाकडी पूल तयार केला असता तर हा त्रास झाला नसता. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा पूल कसा चांगला बनवता येईल आणि वेळेत प्रवाशांची सोय करता येईल, याकडे लक्ष देण्याची मागणी जळगाव व चोपडा तालुक्यातील प्रवाशांनी केली आहे.
गुळी नदीत कालच पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. कोळंबा येथील अवधूत बाबा मंदिरापासून पाण्याचा प्रवाह तापी नदीच्या विरुद्ध दिशेने भोकर, भादली पर्यंत जातो. तिकडे पातळी पूर्ण झाल्यानंतरच खालील कठोरा, पळसोदकडे पाणी वाहते. प्रवाह जोरात असल्यामुळे कच्चा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे खेडी-भोकरी जाणारे लहान, मोठे चारचाकी वाहनांना ऐनवेळेस अडावद, धानोरा मार्गे जळगाव तसेच भोकर कडील वाहनांना विदगाव मार्गे चोपडा असे फिरून जावे लागत आहे. हंगामी लाकडी पूल असता तर वाहनधारकांना त्रास झाला नसता, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
पुढील वर्षी हंगामी लाकडी पूल तयार करा
तापी नदीत हंगामी लाकडी पूल बनवावा, अशी आग्रही मागणी होती. त्यानुसार या वर्षी तात्पुरता कच्चा रस्ता तयार केला होता. तोच रस्ता वाहून गेल्याने प्रवाशांसह वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने पुढील वर्षी येथे हंगामी लाकडी पूल बनवावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
जगन्नाथ बाविस्कर, माजी संचालक, बाजार समिती, चोपडा
रस्ता बंद, फेऱ्याने प्रवास
खेडी भोकरी, भोकर मार्गे जळगाव जाण्यासाठी या नव्या रस्त्यावरून प्रवाशांची संख्या वाढली अाहे. चोपडा, खेडी-भोकरी आणि भोकर ते जळगाव दरम्यान असलेल्या तापी पात्रात जि. प. सदस्य प्रताप पाटील यांनी बी. एन. अग्रवाल यांच्याकडून पाइप टाकून कच्चा पुल बनवला होता. परंतु, आवर्तन सुटल्याने ती माती वाहून गेली. त्यामुळे हा रस्ता बंद झाल्याने आता फेऱ्याने प्रवास करावा लागत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी १११ कोटी रुपये मंजूर करून हा रस्ता नव्याने केला असला तरी भोकर ते खेडी-भोकरी दरम्यान नदीवर पूल उभारावा अशी मागणी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.