आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कवींनी समष्टीचा विचार करून साहित्य परंपरा विस्तारावी; प्रा.डॉ. सतीश बडवे यांचे प्रतिपादन

पाचोरा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्याला स्वतःच्या काळाचे भान असते, अशा कवींनी समष्टीचा विचार करून साहित्याची परंपरा तळागाळापर्यंत पोहोचवली पाहिजे, असे मत प्रा.डॉ.सतीश बडवे यांनी केले.

पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पाचोरा शाखा आणि जळगाव येथील प्राचार्य डॉ. किसन पाटील ज्ञान-परंपरा यांच्या संयुक्त विद्यमाने १२ रोजी प्राचार्य डॉ. किसन पाटील वाङ्मय पुरस्काराचे वितरण पाचोरा येथील शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात झाले, त्या वेळी डॉ. बडवे बोलत होते. अध्यक्षस्थानी व्ही. टी. जोशी होते. माजी प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील, अशोक महाजन, उज्ज्वला महाजन, डॉ. योगेश महाले, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. पी. एम. डोंगरे, प्रा. के. एस. इंगळे, प्रा. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी, डॉ. क्रांती सोनवणे उपस्थित होते.

डॉ. किसन पाटलांनी कर्तृत्वाने खान्देशात मसाप वाढवली
डॉ. अशोक कोळी म्हणाले की, डॉ. किसन पाटील यांनी आपले आयुष्य शैक्षणिक व सामाजिक कार्यास वाहून घेतले. म्हणूनच तर खान्देशात साहित्यिकांची नवीन पिढी घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. गुरुवर्य डॉ. किसन पाटील यांचे शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने खान्देशात मसाप वाढवली. म्हणूनच डॉ. किसन पाटील व महाराष्ट्र साहित्य परिषद हे एक अनुबंध खान्देशात तयार झाले, असे विचार कार्याध्यक्ष प्रा.डॉ. वासुदेव वले यांनी प्रास्ताविकात प्रकट केले.

यांना मिळाले पुरस्कार
या कार्यक्रमात अमरावती येथील कवी पवन नालट यांच्या ‘मी संदर्भ पोखरतोय’ या कविता संग्रहाला ११ हजार रुपये, प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह असे राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात आले. तर दोंडाईचा येथील कवयित्री लतिका चौधरी यांच्या ‘माती’ आणि जळगाव येथील कवयित्री उषा हिंगोणेकर यांच्या ‘धगधगते तळघर’ या कविता संग्रहांना विभागून २ हजार ५०० रुपये, प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह असे खान्देशस्तरीय पारितोषिक औरंगाबाद येथील ज्येष्ठ समीक्षक प्रा.डॉ. सतीश बडवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

हा पुरस्कार लिखाणासाठी ऊर्जा देणारा ठरेल
या वेळी कवी पवन नालट म्हणाले की, ज्या टीकेतून आम्हाला प्रेरणा मिळते त्या टीकेला आमच्यासारखे कवी खूप महत्त्व देतात. मी माझ्या जीवनात अनुभवातूनच कवितेचे लिखाण केले आणि त्या अनुभवातून प्रकट होणाऱ्या कवितांचेच वाचन केले, असे त्यांनी स्पष्ट केले. कवयित्री लतिका चौधरी म्हणाल्या की, हा पुरस्कार मिळाल्याचा मला विशेष अभिमान आहे. असेच पुरस्कार आम्हास साहित्य क्षेत्रात काम करताना खूप मदत करतात. डॉ. किसन पाटलांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार मला लिखाणासाठी नवी ऊर्जा देणारा ठरेल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

बातम्या आणखी आहेत...