आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापिकाच्या जोमदार वाढीसाठी वापरल्या जाणाऱ्या पोटॅशचे दर प्रति बॅग ७०० रुपयांनी वाढले आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे गत तीन महिन्यांत पोटॅशचे दर १ हजार रुपयांवरून १७०० रुपयांवर पोहोचले आहेत. पोटॅश दरवाढीमुळे मिश्रखतांच्या किमतीही १०० ते २५० रुपयांनी वाढल्या. दुसरीकडे डीएपी खताचे दरही १०० रुपयांनी महागले आहे. पेट्रोल व डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे शेती मशागतीचा खर्च वाढला आहे. त्यातच आता ऐन खरिपाच्या तोंडावर रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. त्यात प्रामुख्याने पिकांची चांगली वाढ, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पोटॅशचे दर गगनाला भिडले. भारतात पोटॅशचा पुरवठादार असलेल्या रशिया व युक्रेन युद्धामुळे पोटॅशच्या ५० किलोच्या बॅगचे दर गेल्या चार महिन्यांत ७०० रुपयांनी वाढले. पूर्वी १ हजाराला मिळणारी बॅग आता १७०० रुपयांना मिळते. मिश्र खते २५० रुपयांनी महागली १९:१९.१९,१०:२६:२६ या मिश्र खतांमध्ये पोटॅशचा वापर होतो. त्यामुळे पोटॅश दरवाढीने या मिश्र खतांच्या प्रति बॅगचे दर १०० ते २५० रुपयांनी वाढले आहेत. डीएपीचा भाव तीन महिन्यांपूर्वी १,२५० होता. तो आता १,३५० आहे. सर्वाधिक वापर होणाऱ्या युरियाचे दर मात्र २६६ रुपयांवर कायम आहेत. वारेमाप वापर होणार कमी : शेतकरी जमिनीचे आरोग्य न तपासताच रासायनिक खतांचा वारेमाप वापर करतात. त्यात अनावश्यक खते देखील टाकली जातात. आता रासायनिक खतांचे दर वाढल्याने पिकांना शिफारसींनुसारच खते देण्याकडे कल दिसतो. त्यामुळे उत्पादन खर्च तर वाचेलच, पण अनावश्यक खतांमुळे जमिनीचे आरोग्य बिघडणे थांबेल, अशी माहिती विक्रेते जगदीश जंगले यांनी दिली. त्यामुळे शेतकमऱ्यांनी खतांचा वापर जपूण करणे गरजेचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.