आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात सात आणि तालुक्यात वराडसीम येथे एक अशा आठ परीक्षा केंद्रांवर गुरुवारपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला. एकूण २६२३ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होते. मात्र ३९ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली, प्रत्यक्षात २५८४ विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला. शहरात म्युनिसीपल हायस्कूलच्या परीक्षा केंद्रात कॉपी पुरवण्यासाठी आलेल्या तिघांना पोलिसांनी पकडून प्रसाद दिला. तसेच तिघांना पेपर संपेपर्यंत परीक्षा केंद्राच्या आवारात बसवून ठेवले होते. पेपर आटोपल्यानंतर समज देत तिघांना पोलिसांनी सोडले. पहिल्याच मराठीच्या पेपरला परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त असला, तरी आतून काॅप्या सुरू असल्याचे विद्यार्थ्यांनी पेपर सुटल्यावर सांगितले.
बाहेरून काॅप्या देण्यासाठी येणाऱ्यांना पाेलिसांनी काठीचा प्रसाद दिला. सकाळी १०.३० वाजताच विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर पाेहोचले हाेते. प्रत्येक परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त असूनही काॅपी बहाद्दर हे काॅप्या पुरविण्यासाठी आटापीटा करत होते. मात्र, मराठीच्या पेपरला तालुक्यात एकही कॉपी केस झाली नसल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
आेळखपत्र नेण्यास मज्जाव, डमी परिक्षार्थी केंद्रात शिरण्याची भीती केली व्यक्त
शहरातील एका शाळेत परीक्षार्थींना त्यांच्या शाळेचे आेळखपत्र वर्गात नेण्यास मज्जाव करण्यात आला. त्यांचे आेळखपत्र हे बाहेरच काढून ठेवायला लावले.यामुळे डमी विद्यार्थी पेपर देऊ शकताे, अशी भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. बाेर्डाने याबाबत सूचना दिलेल्या असूनही ओळखपत्राला मनाई करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
परीक्षा केंद्रात शिरकाव
डी.एस. हायस्कूलमधील परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना काॅपी पुरवण्यासाठी, अनेकजण डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यातून शिरकाव करतात. उद्यानाला कुलूप लावल्याने काही काॅपी बहाद्दर पंचायत समितीच्या आवारातून उद्यानात उडी मारतात. तर काही जण उद्यानाच्या बाजूला असलेल्या तारेचे कुंपणातून आत जातात. तसेच म्युनिसीपल हायस्कूलमध्ये मागील बाजूने काॅप्या पुरवणाऱ्यांची गर्दी झाली होती. तेथे पोलिसांनी दुचाकीवर गस्त केली. तरीही कॉपी पुरवणाऱ्यांचे टोळके पोलिसांना न जुमानता, परीक्षा केंद्रात शिरण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी काहींना पकडून प्रसाद दिला.
गोंधळाचा त्रास जाणवला
उत्तरपत्रिकेतील सूचनांचे वाचन करून पेपर लिहिण्यास सुरूवात केली.बाहेरून आेरडणाऱ्यांचा त्रास हाेता,मात्र तिकडे लक्ष न देता पेपर पूर्णपणे साेडवल्याने पेपर सोपा गेला. -हेमंत डाेके , विद्यार्थी, भुसावळ
पेपर वेळेपूर्वीच झाला
पेपर लिहिण्यासाठी पूर्ण वेळ मिळाला.वेळ संपण्यापुर्वीच सर्व उत्तरे लिहून झाली हाेती.जी उत्तरे आधी आठवली ती तात्काळ लिहून घेतली. त्यामुळे अडचण आली नाही. -ललिता काेलते , विद्यार्थिनी, भुसावळ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.