आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ब्रेकिंग:पालिकेच्या 6.94 चौरस किलोमीटर हद्दवाढीचा प्रस्ताव

हेमंत जोशी | भुसावळ10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालिकेने शहराच्या ६.९४ चौरस किलोमीटर हद्दवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव आठवडाभरात नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी जाईल. गेल्या ४६ वर्षांपासून पालिकेची हद्दवाढ झालेली नाही. आता नियोजित प्रस्तावात परिसरातील ७ गावांतील गावठाण भाग वगळता इतर शिवारांचा भाग समाविष्ट केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास शहरातच पण पालिका हद्दीबाहेर राहणाऱ्या सुमारे ३० ते ३५ हजार लोकसंख्येला नागरी सुविधांचा मार्ग मोकळा होईल.

भुसावळ पालिकेच्या मूळ हद्दीचे क्षेत्र १३.३८ चौरस किलोमीटर आहे. त्यात नवीन हद्दवाढीचे ६.९४ चौरस किलोमीटरची भर पडून हे क्षेत्र २०.३२ चौरस किलोमीटर होईल. यापूर्वी पालिकेने ४ फेब्रुवारी २०१९ रोजी दिलेल्या प्रस्तावातील ८ शिवारांपैकी फेकरी शिवार हद्दवाढीच्या प्रस्तावातून वगळले आहे. ७ शिवारांचे क्षेत्र हद्दीत समाविष्ट करण्यासाठी पालिकेने प्रशासकीय ठराव मंजूर केला आहे. या ठरावानुसार सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल. त्यास मंजुरी मिळताच हद्दीबाहेर सुमारे ३५ ते ४० हजार लोकसंख्येला पालिकेमार्फत नागरी सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

प्रस्ताव शासनाकडे पाठवणार
हद्दवाढीचा सुधारित प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावावर प्रशासकीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी होईल. यानंतर प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवणार आहोत. - संदीप चिद्रवार, मुख्याधिकारी, भुसावळ

विकासासाठी एक तृतीयांश खर्चाला मंजुरी
पालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या भागात विकासासाठी नगरपालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या दरडोई खर्चाच्या किमान १/३ एवढी रक्कम किंवा सोईस्कर असेल अशी रक्कम खर्च केली जाणार आहे. या निधीच्या खर्चाला प्रशासकीय ठरावाने मंजुरी दिली आहे.

या भागांचा होणार हद्दीत समावेश
हद्दवाढीनंतर पालिका हद्दीत साकेगाव, मिरगव्हाण, खेडी, खडके, फेकरी, कंडारी, सतारे शिवार यातील गावठाण भाग सोडून उर्वरित सर्वे क्रमांक, या गावांच्या शिवारातील काही भाग, कंडारी शिवारातील सर्वे नंबर २२६, २३९ या भागाचाही समावेश होईल.

बातम्या आणखी आहेत...