आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शहरातील शिवसैनिकांनी एकत्र येऊन पाठिंबा दर्शवत घोषणाबाजी केली.
गेल्या दोन दिवसापासून शिंदे गटाने बंड पुकारल्यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. याच्या निषेधार्थ तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी एकत्र येऊन शिवसेना कार्यालयापासून ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रॅलीला गुलाबराव वाघ यांनी मार्गदर्शन केले. या वेळी घोषणा देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगितले.
या वेळी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, नगरसेवक राजेंद्र महाजन, वासुदेव चौधरी, विलास महाजन, जीवन बयस, राजेंद्र ठाकरे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी वेगवेगळ्या घोषणा देऊन शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे सांगण्यात आले. आज आठवडे बाजार असल्याने नागरिकांची माेठी गर्दी झाली होती. या वेळी अॅड. शरद माळी, भुट्या पाटील, योगेश पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
एकनाथ शिंदेंच्या गटाचा केला निषेध; अजूनही वेळ न गेल्याने परतीचे आवाहन
या वेळी गुलाबराव वाघ म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे वातावरण निर्माण झाले आहे, या घटनेचा आम्ही निषेध करतो. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असून चांगल्या पद्धतीने कामकाज सुरू होते. परंतु एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना घेऊन जो वेगळा गट तयार केला, याचा जाहीर निषेध करत आहोत. तसेच उद्धव ठाकरे हे भारतात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून घोषित केलेले आहे. ज्या आमदारांनी बंड पुकारले आहे; त्यांनी अजूनही वेळ गेली नसून आपण पुन्हा विचार करावा व शिवसेनेत परत यावे, असेही ते म्हणाले.
आम्ही त्यांच्यासोबत नाहीत : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या भूमिकेविषयी विचारले असता, गुलाबराव वाघ म्हणाले की, त्यांचा प्रश्न हा विधानसभे पुरता मर्यादित आहे. परंतु, आम्ही मात्र बंडखोर मंत्री व आमदारांच्या भूमिकेचा जाहीर निषेध करत असून आम्ही त्यांच्यासोबत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.