आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:पुनखेडा, पातोंडी, खिरवड, विटवा परिसराला वादळाचा तडाखा; केळीबागा झाल्या भुईसपाट

रावेर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर तालुक्यात शनिवारी सायंकाळी वादळासह पावसाने हजेरी लावली. गेल्या ११ दिवसांत सलग तीनवेळा वादळाचा तडाखा बसल्याने केळीचे पीक मातीमोल झाले. प्रामुख्याने पूनखेडा, पातोंडी, खिरवड व विटवा या गावांच्या शिवारातील केळीचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आली. अनेक ठिकाणी वीज तारा तुटल्याने रावेर शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला.

३१ मे रोजी अहिरवाडी परिसरातील गावांना, तर ८ जूनला धामोडी, कांडवेल परिसराला वादळासह पूर्वमोसमी पावसाचा तडाखा बसला होता. यानंतर शनिवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास पूनखेडा, पातोंडी, खिरवड व विटवा परिसराला वादळाने तडाखा दिला. त्यात नारायण धनगर, भगवान बोरसे, विलास बोरसे, जगन्नाथ बोरसे, समाधान पाचपोळे, लक्ष्मण सावळे, स्वप्नील सावळे, अशोक गाबा पाटील, हरीश पाटील, डॉ.गुलाबराव पाटील, विनोद पाटील, हिंमतराव पाटील, विजय पाटील, बिजलाल लवंगे, पंकज मधुकर सपकाळे यांच्यासह अनेकांच्या केळीबागांचे मोठे नुकसान झाले.

रावेरला जोरदार सरी
सकाळपासून उकाड्याने हैराण झालेल्या रावेरवासीयांना सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने दिलासा मिळाला. शहरात एक तास जोरदार पर्जनवृष्टी झाली. दरम्यान, वादळाने भोर, स्टेशन रोड तसेच शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वीज तारा तुटल्या. शहरात सकाळी सहा तास वीजपुरवठा खंडित असताना पुन्हा तासाभरात बत्ती गूल झाली. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी उपविभागीय अभियंता अनिल पाटील, कनिष्ठ अभियंता दिलीप सुंदरानी, भिका साळुंके हे कर्मचाऱ्यांसह दुरुस्ती करत होते.

रावेर-पातोंडी मार्ग बंद
वादळामुळे रावेर-पुनखेडा-पातोंडी मार्गावर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. परिणामी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. अनेक गावांमध्ये चौकात आमदार, खासदार निधीतून लावलेले हायमास्ट लॅम्प देखील तुटून पडले आहेत. काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी वीज खांब वाकले असून झाडांच्या फांद्या पडून वीज तार तुटल्याने शेतीशिवारातील वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती उप विभागीय अभियंता अनिल पाटील यांनी दिली.

घरांवरील पत्रे उडून नुकसान
निंबोल रावेर तालुक्यातील पुनखेडा, पातोंडी, स्टेशन रोड या रावेर परिसराला शनिवारी दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. त्यात केळीचे नुकसान झाले. स्टेशन रोड शिवारात अखिल भारतीय बनाना महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. वादळामुळे पुनखेडा-पातोंडी रस्ता व परिसरात झाडे उन्मळून पडल्याने रस्ता बंद झाला. काहींच्या घरावरील पत्रे उडाली. स्टेशन रोड रावेर शिवारातील पोल व तारा तुटून पडल्याने वीजपुरवठा बंद झाला होता. पुनखेडा येथे हायमास्ट पोल उन्मळून पडला.

न्हावी
यावल तालुक्यातील न्हावी येथे शुक्रवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अण्णाभाऊ साठे नगरातील ८० ते ९० वर्षांपूर्वीचे झाड उन्मळून पडले. त्यात आजूबाजूच्या १२ ते १३ घरांचे नुकसान झाले. तलाठी ए.एस.महाजन यांनी या नुकसानीचे पंचनामे केले. त्यात सुमारे अडीच ते तीन लाखांपर्यंत नुकसान झाल्याचे समोर आले.

नुकसान ग्रस्त कुटुंबामध्ये अनुक्रमे धोंडू कडू तायडे, रमेश तुकाराम मोरे, रामदास तुकाराम मोरे, दीपचंद मंगा मोरे, लक्ष्मण दीपचंद मोरे, श्रावण सुका मरसाळे आदींचा समावेश आहे. तसेच तडवी वाडा येथील कादर नामदार तडवी यांचेही नुकसान झाले. न्हावी परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेचे पोल व तारा तुटल्याने शुक्रवार रात्री ते शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे १८ तास वीजपुरवठा खंडित झाला होता. या नुकसानग्रस्त ठिकाणी सरपंच भारती चौधरी, उपसरपंच उमेश बेंडाळे, नितीन चौधरी, यशवंत तळेले, रवींद्र तायडे, प्रवीण वारके यांनी भेट देऊन पाहणी केली

बातम्या आणखी आहेत...