आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या मोहराळा या गावात वन विभागाच्या पथकाने छापा टाकत मोठ्या प्रमाणावर सागवानी लाकूड जप्त केले आहे. तसेच सागवानी लाकूड काढण्यासाठीचे अवजारे असा एकूण अडीच लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईमुळे अवैधरीत्या सागवानी वृक्षतोड करणारे व त्याचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
यावल प्रादेशिक वन विभागाच्या पश्चिम हद्दीत मोहराळा या गावात अवैधरीत्या सागवानी लाकूड एका घरात ठेवून त्या ठिकाणी त्याचा व्यवसाय केला जात असल्याची गोपनीय माहिती वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक दि.वा. पगार, उपवन संरक्षक एस.एच. पदनाम यांना मिळाली. त्यांच्या आदेशावरून यावल प्रादेशिक वन विभाग जळगाव कार्यालयाचे सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे, यावल प्रादेशिक पश्चिम वनक्षेत्र अधिकारी एस.टी. भिलावे, गस्ती पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आनंदा पाटील, वन विभाग पूर्व प्रादेशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर या अधिकाऱ्यांनी स्वतः सापळा लावला. कर्मचाऱ्यांच्या मदतीने थेट मोहराळा गावात छापा टाकला.
त्यावेळी गावातील अयुब हसन तडवी यांच्याकडे तब्बल दोन घनमीटर सागवानी लाकूड मिळून आले. तसेच इलेक्ट्रिक मशीनवर चालणारे रंधा मशीन यंत्र, इलेक्ट्रिक मोटार असे लाकूड कापण्याचे सुमारे ५० हजारांचे साहित्य व दोन लाखांचा सागवानी लाकूड फाटा मिळून आला. सर्व लाकूड वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेत ते येथील वन उपज केंद्रात जमा केला. रात्री उशिरापर्यंत या सर्व मुद्देमालाचा पंचनामा सुरू होता. या कारवाईत अधिकाऱ्यांसोबत वनपाल आर.बी. पाटील, आर.पी. तायडे, आर.एस. सिद्धे आदींचा समावेश होता. २ वाहनांद्वारे जप्त मुद्देमालाची रात्री उशिरापर्यंत संपूर्ण मोजणी व गुन्हा दाखलची कार्यवाही सुरू होती.
तालुक्यातील मोठी कारवाई; अनेकांच्या नाड्या आवळणार
वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन केलेली ही तालुक्यात मोठी कारवाई ठरली आहे. या कारवाईमुळे सातपुड्याच्या अभयारण्यातून मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या सागवानी लाकूड तोडून त्याची विविध ठिकाणाहून लावली जाणारी विल्हेवाट पाहता या कारवाईमुळे अनेकांच्या मुसक्या व व्यवसायाच्या नाड्या आवळल्या जाणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.