आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रवाशांचे हाल:इटारसीपासून भुसावळ विभागापर्यंत रेल्वेचे ट्रॅफिक जाम; 30 रेल्वेगाड्या खोळंबल्या

भुसावळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळच्या आरआेएच डेपाेजवळ स्थानकाबाहेर थांबलेल्या रेल्वेगाडीतील प्रवाशांनी खिचडी, पाणी घेण्यासाठी अशी गर्दी केली हाेती. - Divya Marathi
भुसावळच्या आरआेएच डेपाेजवळ स्थानकाबाहेर थांबलेल्या रेल्वेगाडीतील प्रवाशांनी खिचडी, पाणी घेण्यासाठी अशी गर्दी केली हाेती.
  • 44 अंशांच्या तापमानात जेवण, पाण्याअभावी स्थंलातरित मजूर आणि कामगारांचे प्रचंड हाल

लाॅकडाऊनच्या काळात परप्रांतीय मजुरांसाठी विशेष श्रमिक रेल्वे गाड्या साेडल्या जात आहेत. देशभरातून या गाड्या जात असल्याने मध्य प्रदेशात जाणाऱ्या रेल्वेमार्गावर शुक्रवारी रेल्वेची ट्रॅफिक जाम झाली. यामुळे गुरुवारी रात्री ११.३० वाजेपासून इटारसीपासून भुसावळ विभागापर्यंत विविध मार्गावर रेल्वेगाड्यांना थांबवण्यात आले. काही गाडी स्थानकांवर, तर काही आऊटरला थांबल्या होत्या. यामुळे भुसावळ विभागात ठिकठिकाणी ३० रेल्वेगाड्या थांबल्या हाेत्या. ४४ अंशांच्या तापमानात या गाड्यांमधील प्रवाशांचे जेवण-पाण्यावाचून प्रचंड हाल झाले.

शुक्रवारी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये जाणाऱ्या गाड्यांची संख्या अधिक होती. आहे. त्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. गुरुवारी रात्री इटारसीला पहिली रेल्वेगाडी थांबली, त्यामुळे या गाडीमागून जाणाऱ्या गाड्यांना इटारसी ते खंडव्यादरम्यान विविध रेल्वे स्थानकांवर थांबवण्यात आले. अशा प्रकारे गाड्यांची रांग वाढत गेल्याने, मिळेल, त्या स्थानकावर गाड्या थांबवल्या जात होत्या. प्रत्येक गाडीच्या डब्यात ५२ प्रवासी असल्याने उन्हात या प्रवाशांचे हाल झाले. खंडवा, बऱ्हाणपूर, रावेर, भुसावळ, जळगाव आदी स्थानकांसह काही स्थानकांच्या आऊटरलाही गाड्या थांबवल्या हाेत्या.

खिचडीची ४०० पाकिटे वितरित

शहरातून परप्रांतात पायी जाणाऱ्या मजुरांसाठी दोन महिने भोजनसेवा देणारे नगरसेवक निर्मल कोठारी यांनी आऊटरवरील रेल्वेगाडीतील प्रवाशांना ४०० जेवणाची पाकिटे दिली. ही पाकिटे हातोहात संपल्याने त्यांनी तासाभरात पुन्हा ९० किलो तांदळाची खिचडी तयार करून वाटली. सोबतच त्यांनी ३०० डझन केळीदेखील प्रवाशांना दिली. सोबतच त्यांनी पाण्याचे ११० जार आणि मुलांसाठी बिस्कीट पुडे वितरित केले. या कामात कोठारी यांना त्यांच्या मित्रांनी मदत केली.

तब्बल १६ गाड्या नागपूरमार्गे वळवल्या

भुसावळ विभागात उभ्या असलेल्या गाड्यांपैकी तब्बल १६ रेल्वेगाड्या नागपूरमार्गे वळवल्या. काही तास गाड्या थांबून त्या पुन्हा चालवल्या जात आहेत. लवकरच मार्ग माेकळा झाल्यानंतर गाड्या नियाेजित वेगात धावतील.-आर.के. शर्मा, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक, भुसावळ

भुकेने मुलांचे हाल :

भुसावळ जंक्शनवरदेखील तीन रेल्वेगाड्या उभ्या हाेत्या. या गाड्यांमधील प्रवाशांना रेल्वे प्रशासनातर्फे पाण्याच्या बाटल्या आणि जेवणाचे पाकीटे देण्यात आली. मात्र झाेनल ट्रेनिंग सेंटरजवळ आऊटरला उभ्या असलेल्यांना जेवण मिळाले नाही. त्यामुळे भुकेने व्याकूळ झालेली लहान मुले गाडीतच रडू लागली.

यामुळे खाेळंबा

सध्या मालगाड्या, पार्सल गाड्या आणि श्रमिक एक्स्प्रेस माेठ्या संख्येने धावत आहेत. एकाच वेळी अनेक गाड्या धावत असल्याने श्रमिक एक्स्प्रेस गाड्यांचा खाेळंबा झाला. यामुळे काही गाड्यांच्या मार्गात बदल करून त्या गाड्या नागपूरमार्गे वळण्यात आल्या.

बच्चा पानी के लिये रात से रो रहा है, २० घंटे से पिने का पानी नहीं मिला

कृष्णा पाटील | रावेर

मुंबई (बोरिवली) येथून गुरुवारी दुपारी ३.३० वाजता निघालेली २२ डब्यांची श्रमिक एक्स्प्रेस शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता रावेर स्टेशनवर थांबवण्यात आली. दुपारी ३ वाजेपर्यंत ही गाडी थांबून होती त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. थेट मुंबईपासून रावेरपर्यंत या गाडीतील प्रवाशांना पिण्याचे पाणीही मिळाले नाही. याच गाडीने जाणाऱ्या सुमित्रा शर्मा (रा. उत्तर प्रदेश) या त्यांच्या तीन मुलांसह जोनपूर येथे त्यांच्या मूळ गावी जात होत्या. त्यांचा सर्वात ८ वर्षांचा लहान मुलगा रात्रीपासून पिण्याचे पाणी मागत होता. घरून आणलेले पाणी काही वेळातच संपल्याने २० तास तो तहानेने व्याकूळ झाला होता. त्यामुळे ‘बच्चा पानी के लिये रात से रो रहा है, २० घंटे से पिने का पानी नहीं मिल रहा,’ अशी व्यथा सुमित्रा शर्मा यांनी व्यक्त केली.

भोपाळ डिव्हिजनमध्ये नो एन्ट्री चर्चा :

मुंबईवरून इटारसीकडे जाणाऱ्या श्रमिक एक्स्प्रेस गाड्या खंडवा ते भुसावळदरम्यान प्रत्येक स्टेशनवर थांबवण्यात आल्या होत्या. या गाड्यांना भोपाळ डिव्हिजनमध्ये प्रवेश दिला जात नसल्याची चर्चा प्रवाशांमध्ये सुरू होती. वाघोडला दोन, रावेर, सावदा, निंभोरा येथे प्रत्येकी एक गाडी उभी होती.

मदद करने वाले तो भगवान है

जोनपूर येथील सुमित्रा शर्मा या त्यांची १४, ११ व ८ वर्षांची तीन मुले या गाडीत प्रवास करत होती. आठ वर्षांचा लहान मुलगा पाण्यासाठी कासावीस होऊन रडत होता. त्यामुळे या मातेने मदत करणाऱ्यांचे आभार मानले. ‘गाडी छुटने के २० घंटे बाद रावेर स्टेशन पर पाणी और नाश्ता मिला. यहा के लोग बहुत दयालू है. मदत करने वाले तो सचमूच भगवान है,’ असे म्हणत त्यांनी मदत करणाऱ्यांचे आभार मानले. या वेळी कर्तव्यावर असलेले, आरपीएफचे कर्मचारी प्रवाशांना पाण्यासाठी होणारी गर्दी टाळण्याचे आवाहन करीत होते.

डब्यातील लाइट, पंखे बंद

रावेर स्टेशनवर थांबलेल्या एक्स्प्रेसच्या एस-५ व एस-९ अशा दोन डब्यातील लाइट व पंखे सकाळपासून बंद होते. त्यामुळे दुपारी ४४ अंश तापमानात डबे तापल्याने लहान मुलांसह प्रवाशांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. बोरिवली येथून ही गाडी गुरुवारी दुपारी ३.३० वाजता निघाल्यावर रावेरपर्यंत कोणत्याच ठिकाणी पाण्याची सुविधा न मिळाल्याने प्रवाशांचे हाल झाले.

बातम्या आणखी आहेत...