आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्यथा टोल बंद आंदोलन:मुक्ताईनगरलगत सर्व्हिस रोडवरील धोकादायक खड्ड्याची दुरुस्ती करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला इशारा

अंतुर्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग क्र.५३ अंतर्गत मुक्ताईनगर शहरालगतच्या सर्व्हिस रोडवर गेल्या तीन महिन्यांपासून मोठा खड्डा पडला असून त्यामुळे सर्व्हिस रोडवरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. या खड्ड्यामुळे रात्रीच्या वेळी मोठी दुर्घटना होऊन जीवितहानीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही निवेदनात म्हटले आहे. या खड्ड्याची तातडीने दुरुस्ती करा अन्यथा टोल बंद आंदोलन करू, असा इशारा संघटनेने दिला.

या रोडवरील खड्ड्यांची देखभाल दुरुस्ती राजमार्ग प्राधिकरणाच्या कंत्राटदारांकडून तत्काळ करणे अपेक्षित होते. परंतु कंत्राटदाराकडून देखभाल दुरुस्तीकडे हेतुपुरस्सर कानाडोळा केला जात आहे की काय, अशी चर्चा परिसरात असल्याचे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी म्हटले आहे. खेदाची बाब म्हणजे निविदा व अटी शर्तीनुसार सदर खड्डा तत्काळ दुरूस्त करणे बंधनकारक असूनही शासनाच्या निविदा अटी-शर्तींना प्राधिकरणाकडून केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे. तसेच प्रकल्प संचालकही ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत का, असा प्रश्न परिसरात विचारला जात आहे. राजमार्ग प्राधिकरण गोरगरीब जनतेकडून टोल वसूल करण्यासाठी जी सक्ती दाखवते किंवा फास्टॅग नसल्यास जी दामदुप्पट रक्कम वसूल करते, त्याच न्यायाने तीन महिन्यांपासून या खड्ड्यांची दुरुस्ती न करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल का? असा सवाल स्वाभिमानी संघटनेने केला. राष्ट्रीय राजमार्गावरील मुक्ताईनगर शहरालगत असलेल्या सर्व्हिस रोडवरील जीवघेणा खड्डा तत्काळ दुरूस्त न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने टोल बंद आंदाेलन छेडण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकल्प संचालकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...