आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा शहरात तब्बल पाच वर्षांनंतर नुकत्याच झालेल्या कुस्तीच्या दंगलीत युवा महिला कुस्तीपटूंचा थरार सर्वांनी अनुभवला. राज्य आणि परराज्यातून आलेल्या कुस्तीपटूंनी आपले कसब दाखवत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. शेवटच्या कुस्तीत मालेगाव येथील सैफ अली यांनी बाजी मारली. शहरात कालुशाह वली बाबा आखाडा व हिंदू-मुस्लिम एकता समितीने रविवारी कुस्तीच्या दंगलीचे आयोजन केले होते. सुरुवातीला युवा महिला कुस्तीपटूंची कालु शाह वली बाबा दर्गा, शहरवासीयांचे कुलदैवत रेणुकामाता मंदिर येथून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
नंतर महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात माजी नगराध्यक्ष सुनील काळे, चंद्रकांत बढे, माजी नगरसेवक रवींद्र सोनवणे, बाळासाहेब चौधरी, उत्तम पहिलवान, शकील पहिलवान यांच्या हस्ते मारुतीरायाच्या प्रतिमेचे पूजन व श्रीफळ फोडून कुस्तीच्या दंगलीला सुरुवात करण्यात आली. पंच म्हणून उत्तम पहिलवान, शकील पहिलवान, पवन पहिलवान, शेख कय्यूम शेख फय्युम, इरफान कुरेशी यांनी काम पाहिले.
एपीआय आशिषकुमार अडसूळ व उपनिरीक्षक परशुराम दळवी यांच्या व मान्यवरांच्या हस्ते कुस्त्यांची जोड लावण्यात आली . वसीम बापू, आवेश भांजा, अख्तर पहिलवान, सबदर पहिलवान, मंजूर पहिलवान, रजिक पहिलवान यांची उपस्थिती होती. शेख रफीक, शामराव धनगर, शेरु माळी, विजय वाघ यांचेसह इतर कुस्तीप्रेमींनी सहकार्य केले.
असे आहेत विजेते
कुस्तीच्या दंगलीमध्ये सैफ अली (मालेगाव ) यांनी बाजी मारली. तर दामू वाकोडे, सोहील पहिलवान, तहूर पहिलवान, सूरज चौहान, रैंचू पहिलवान (हरीयाणा) व सल्लाउद्दीन पहिलवान (मालेगाव) यांच्या कुस्त्या बरोबरीत सुटल्या. इम्रान पहिलवान व दिनेश पहिलवान यांच्या कुस्तीत इम्रानने बाजी मारली. विजेत्यांना १०० ते १५ हजार रुपयांपर्यंत बक्षिसे देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.