आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर व तालुक्यातील सर्व २०२ शाळा बुधवारी प्रथमच पूर्ण क्षमतेने खुल्या झाल्या. या पहिल्याच दिवशी शाळेत आलेले विद्यार्थी सुरूवातीला आनंदी व उत्साही होते. मात्र, गर्दी पाहून पहिलीतील विद्यार्थी भांबावले. सोबत असलेल्या पालकांनी त्यांची समजूत काढली. दरम्यान, बुधवारी सकाळी ७ ते दुपारी १ या शालेय वेळेत शाळापूर्व तयारीचे उपक्रम, पालक मेळावे असल्याने कुठेही ज्ञानदान झाले नाही. मात्र, पहिली ते सातवीच्या ९३ टक्के विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि ४,७३३ पैकी ३,५५० म्हणजेच ७५ टक्के विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झाले.
तालुक्यातील साकरी येथील शाळेत प्रवेशोत्सव साजरा झाला. उद्घाटन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते झाले. यानंतर नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत झाले. मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप झाले. बीडीओ विलास भाटकर, गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे उपस्थित होते. आमदार सावकारे यांनी शाळा पूर्वतयारी मेळावा-२ चे फित कापून उद्घाटन केले. यानंतर मेळाव्यातील सर्व सातही स्टाॅल्सवर भेट दिली.
अशा झाल्या बसफेऱ्या
कोरोनापासून बंद झालेल्या ग्रामीण भागातील बस सेवेला बुधवारचा मुहुर्त मिळाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात ये-जा करता यावी यासाठी महामंडळाने बससेवा सुरू केली. यात कुऱ्हा, सिंधी, सुरवाडा, तळवेल, पिंपळगाव, हिंगोणा, मांगी थोरगव्हाण, पिंप्रीसेकम, भिलमळी, मन्यारखेडा, साकरी, बेलव्हाय, वराडसीम, कंडारी, सावतर निंभोरा, खडका, उदळी, लोणवाडी, लोहारा, बेटावद मोहीखेडा, करंजी येथे बससेवा सुरू झाली. पहिल्याच दिवशी ७०० विद्यार्थ्यांनी महामंडळाच्या बसने प्रवास केला.
गुरुकुलमध्येही स्वागत... साकेगाव येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल येथे प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित केला होता. मुख्याध्यापक व शिक्षकानी विद्यार्थ्यांना हसतखेळत शिक्षण घ्यावे, आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक दृष्टीकोनातून मास्क, सॅनिटायझर, स्वच्छतेविषयक नियम पाळण्याची सूचना केली.
२५% गणवेशाविना
तालुक्यातील शाळांमध्ये पात्र ४,७३३ पैकी ३,५५० विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेशाचा लाभ मिळाला. उर्वरित २५ टक्के विद्यार्थ्यांना येत्या दोन दिवसात नवीन गणवेश मिळतील. तालुक्याला पहिली ते आठवीच्या वर्गांसाठी सर्व विषयांच्या १ लाख ६६ हजार ७६८ पुस्तकांची मागणी होती. पैकी १ लाख ६४ हजार ११९ (९३ टक्के) पुस्तके प्राप्त झाली होती. बुधवारी १५८ शाळांमधील विद्यार्थ्यांना या सर्व पुस्तकांचे वाटप. उर्वरित २, ६४९ पुस्तके शासनाकडून प्राप्त होताच वाटप करू, असे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.