आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडसाद:शिवसैनिक म्हणतात आमची निष्ठा पक्षावर, शिंदेसारखी अनेक वादळे आली-गेली, शिवसेना पुन्हा उभारी घेईल

भुसावळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे व आमदारांच्या नाराजी नाट्याचे पडसाद मंगळवारी शहरातही उमटले. जामनेर रोडवरील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात सायंकाळी शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. आतापर्यंत शिवसेनेत किती जण आले व गेले. पण शिवसेना खंबीर आहे व भविष्यातही खंबीर राहील. पुन्हा उभारी घेईल अशी भावना शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे व शिवसैनिकांनी व्यक्त केली.

शहर व तालुक्यातील शिवसैनिकांनी सायंकाळी जामनेर रोडवरील शिवसेनेचे कार्यालय गाठले. नंतर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. छगन भुजबळ, राज ठाकरे, नारायण राणे असे अनेक जण सोडून गेले. मात्र, शिवसेना थांबली नाही. पुन्हा उभारी घेतली, अशी भावना व्यक्त केली. विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका संघटक प्रा. धीरज पाटील, उपजिल्हा प्रमुख प्रा. उत्तमराव सुरवाडे, माजी नगरसेवक दीपक धांडे, मुकेश गुंजाळ, ललित मुथा, प्रा. विनोद गायकवाड, गजानन नीळे, सूरज पाटील, हेमंत बऱ्हाटे, तालुका संघटक भुराबाई चव्हाण उपस्थित होते.

रावेरात सर्व पक्षांच्या कार्यालयांमध्ये शांतता, आमदार मुंबईत थांबून

रावेर तालुक्यात भाजप, शिवसेना, काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये दिवसभर शुकशुकाट होता. राष्ट्रवादीचे माजी आमदार अरुण पाटील यांच्या संपर्क कार्यालयात काही पदाधिकाऱ्यांसह नागरिक घडणाऱ्या घटनांवर चर्चा करताना दिसले. शहरात देखील ठिकठिकाणी सकाळपासूनच राजकीय चर्चांना ऊत आला. ठाकरे सरकार कोसळेल, अशी चर्चा एका गटाकडून होत होती. तर शरद पवार असल्याने सरकार टिकेल, असा प्रतिस्पर्धी गट दावा करत होता. रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी यांच्या संदर्भात नागरिक चर्चा करताना दिसून आले. ते नेमके कुठे आहेत, अशी माहिती नागरिक उत्सुकता म्हणून विचारत होते. आमदार चौधरी मंगळवारी दिवसभर मुंबईत थांबून होते, असे समोर आले.