आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दीपनगरातील सौर ऊर्जा प्रकल्पाला तूर्त नकार ; नियोजित 80 एकर जागा उच्च दाब वाहिन्यांमुळे अडचणीची

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२१च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ७० कोटी रुपये निधीतून दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात २० मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पाला मंजुरी दिली होती. प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन (ईपीसी) तत्वावर उभारणी नियोजित असलेल्या या प्रकल्पाचे भविष्य आता अधांतरी आहे. कारण, दीपनगरातील सध्या वापरात नसलेल्या ज्या ८० एकर जागेवर प्रकल्पाचे नियोजन होते, ती जागाच तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे महानिर्मितीच्या सौर उर्जा विभागाने स्पष्ट केले आहे.

औष्णीक ऊर्जेला सौर उर्जेची जोड देण्यासाठी महानिर्मितीने राज्यभरात ५७७ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारणीचे नियोजन केले होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ८ सप्टेंबर २०२१ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत त्यास मंजुरी दिली होती. यात दीपनगरातील २० मेगावॅट प्रकल्पाचा समावेश होता. औष्णिक केंद्रात सध्या वापरात नसलेली ८० एकर जमीन यासाठी वापरली जाणार होती. मात्र, या जागेवरून उच्च दाब शक्तीच्या वाहिन्या गेल्या आहेत. त्यामुळे तेथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जावू शकत नाही, असा अभिप्राय महानिर्मितीच्या सौर ऊर्जा विभागाने दिला आहे. दीपनगरातील २१० मेगावॅटचा संच क्रमांक २ कायमस्वरुपी बंद केला आहे. तर संच क्रमांक ३ आगामी काळात बंद होऊ शकतो. या जागेवर भविष्यात हा प्रकल्प होऊ शकेल, असे सांगितले गेले. मात्र, त्याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.

शेतकऱ्यांना मिळाला असता दिलासा
भुसावळ विभागाचे उन्हाळ्यात सरासरी तापमान ४४ ते ४५ अंशावर असते. या काळात सौर उर्जा प्रकल्पातून अधिक प्रमाणात वीजनिर्मिती शक्य आहे. उन्हाळ्यात या प्रकल्पातून रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड व भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना ३३ बाय ११ केव्ही जोडणीवर पुरवठा करून अखंड वीजपुरवठा होऊ शकला असता.

योग्य जागा नसल्याने होतोय विलंब
दीपनगरातील सौर उर्ज प्रकल्प जुने संच तोडल्यानंतर त्या जागेवर उभारणीचे नियोजन होते. त्यास मंजुरी मिळाली. मात्र, अद्याप योग्य जागा उपलब्ध नसल्याने विलंब झाला. भविष्यात मात्र हा प्रकल्प नक्की होईल. यासाठी पाठपुरावा करू. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटून विषय मांडण्यात येईल.
संजय सावकारे, आमदार

बातम्या आणखी आहेत...