आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालसंस्कार शिबिर:हनुमान मंदिरात 110 विद्यार्थ्यांना अध्यात्मिक धडे; 16 मे रोजी होणार काल्याचे कीर्तन

बोदवड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवक, तरुणांमध्ये अध्यात्मिक संस्कार व्हावे, वारकरी संप्रदायाची गोडी लागावी यासाठी खापरखेडा बेलाड (ता.मलकापूर) येथे आदि शक्ती संत मुक्ताबाई वारकरी सांप्रदायिक बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले आहे. १ मे पासून सुरू झालेल्या शिबिराचा समारोप १६ मे रोजी होईल. त्यात ११० मुलांचा सहभाग आहे. दरम्यान, फैजपूर येथील महामंडलेश्वर जनार्दन महाराजांनी शिबिरस्थळी भेट देऊन मुलांचा उत्साह वाढवला.

सध्या लहान मुले मोबाइल आणि टीव्हीच्या प्रचंड आहारी गेली आहेत. यामुळे त्यांच्या कलागुणांचा विकास खुंटला आहे. अनेक जण व्यसनांच्या आहारी जात आहे. ही स्थिती बदलण्यासाठी व नैतिक मूल्यांची जोपासना, अध्यात्मिक संस्कार घडवण्याच्या हेतूने मलकापूर येथील नितीनदास महाराजांनी या बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले आहे. त्यात बोदवड तालुक्यातील बोदवड, शेलवड, जलचक्र, घाणखेड व मलकापूर, वाघोडा, बेलाड, विटाळी, पिंपळखुटा, बाह्मांदा, वढोदा, पिपरी गवळी, चावरदा, खामगाव येथील मिळून एकूण ११० मुलांचा समावेश आहे. त्यांना मृदंग वादन, गायन, पावली, भगवद्गीता, हरिपाठ, योगासने, हनुमान चालिसा, निवडक संस्कृत सुभाषिते, अभंग पाठांतर, कीर्तन, संत चरित्रकथा, महापुरुषांची चरित्रे शिकवली जात आहेत. विजय महाराज खवले, शिवशंकर महाराज डीघी, शिवाजी महाराज रायपुरे, चंद्रकांत महाराज पांचाळ आळंदी, प्रल्हाद महाराज उमाळी, चांगदेव महाराज पिंपळखुटा, प्रशांत महाराज पाटील आळंदी हे शिक्षक प्रशिक्षण देत आहेत. १६ मे रोजी मुक्ताईनगर येथील रवींद्र हरणे महाराजांचे काल्याचे कीर्तन होईल.

बातम्या आणखी आहेत...