आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरामागील बाजूस भांडी धुणाऱ्या मुलीची छेडखानी व त्यानंतर दगडफेक झाल्याने जामनेरातील गणेशवाडी परिसरात गुरूवारी रात्री तणाव निर्माण झाला होता. सुज्ञ नागरिक व वेळीच पोहचलेल्या पोलिसांमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी शुक्रवारी तातडीने जामनेर पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेतली. गुरूवारी रात्री घरामागील बाजूस एक तरूणी भांडी धुत होती. यावेळी पाठीमागील बाजूस असलेल्या इमारतीवरून एका तरूणाने तरूणीला इशारा केला. तरूणीने ही बाब कुटुंबीयांना सांगितल्यानंतर संरक्षण भिंतीजवळ लपून बसलेल्या त्या तरूणास पकडले. यावेळी वाढलेला आवाज व गोंधळ पाहाता परिसरातील नागरिक घराबाहेर आले.
यात नगरसेवक महेंद्र बाविस्कर, जितेंद्र पाटील, बुडू माळी, आत्माराम शिवदे, सुभाष पवार तर दुसऱ्या बाजूने नगरसेवक शेख रिजवान, अनीस शेख बिसमिल्ला, मुश्ताक अली सैय्यद करीम, न्याजमहंमद अब्दूल वाहेद, खलील खान रमजान खान, शेख नुरूद्दीन अमिरोद्दीन यांनी तरूणास मारहाण न करता पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचवेळी दगडफेक झाली व गणेशवाडी परिसरातील विशाल विठ्ठल पवार हा तरूण जखमी झाल्याने तणाव निर्माण झाला. दरम्यान या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक प्रताप इंगळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या प्रकरणी अलका भिवा मोरे यांच्या फिर्यादीवरून संबंधिताविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली अाहे. दरम्यान, या प्रकरणात मध्यरात्रीच संशयित म्हणून एका तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कुठलीही घटना घडली की रस्त्यावर येऊ नका, संयम ठेवणे आवश्यक
दोन घरातील वादाचे रूपांतर दोन गटामध्ये होणे चुकीचे आहे. अशा घटनेला सामाजिक रंग देऊ नये, काही लोक विघ्नसंतोषी असतात, अशा समाजकंटकांना पाठिशी घालणे चुकीचेच अाहे. तरूण मुलांवर घरातील मोठ्यांनी नियंत्रण ठेवायला हवे, कोणत्याही घटनेवर तणाव वाढून दगडफेक व्हावी, हे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. कुठलीही घटना घडली की रस्त्यांवर येणेही बंद झाले पाहिजे. यामुळे सामाजिक स्वास्थ बिघडते. या शिवाय अशा घटनांमधील दोषींवर कडक कारवाई करू, असे आश्वासन जामनेर येथील शांतता समितीच्या बैठकीत डाॅ. प्रवीण मुंडे यांनी दिले अाहे.
अशा प्रकाराचे समर्थन नाहीच
घडलेला प्रकार चुकीचाच आहे. समाजातील प्रमुख पदाधिकारी, मान्यवरांनी सहभाग घेतल्यानेच हा प्रकार थोडक्यात निवळला. मात्र अशा विकृत प्रकाराचे आम्ही कधीही समर्थन करणार नाही. दोषीला कठोर शिक्षा व्हावी, असे मत शांतता कमिटीच्या बैठकीत नगरसेवक महेंद्र बाविस्कर, शेख रिजवान अब्दूल लतिफ, माजी नगरसेवक जावेद इक्बाल अब्दूल रशिद, आत्माराम शिवदे यांनी मांडले. या वेळी तहसीलदार अरूण शेवाळे, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे असे दाेन्ही समाजातील मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.
शांतता समन्वय बैठकीत बोलताना नगरसेवक महेंद्र बाविस्कर व उपस्थित मान्यवरांसह डॉ. प्रवीण मुंढे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.