आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन दिवसांपुर्वी यावल आणि रावेर तालुक्यात वादळी पावसामुळे केळी पिकाचे नुकसान झाले होते. त्यानंतर पुन्हा या तालुक्यांमधील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सातपुड्याच्या कुशीत मोर धरणाच्या परिसरात असलेल्या आदिवासी बांधवांच्या झोपड्या वादळामुळे जमीनदोस्त झाल्या, तसेच मातीचे घर पडून गाय आणि वासरू दगावले. तर खिरोदा येथील बेघर वस्तीत ८ रोजी दुपारी झालेल्या पावसामुळे, तुटलेल्या वीजतारेच्या स्पर्शाने बालक दगावला.
खिरोदा येथील बेघर वस्तीत ८ रोजी दुपारी झालेल्या चक्रीवादळामुळे विजेच्या तारा तुटल्या होत्या. त्या तारांमध्ये वीजप्रवाह सुरू होता. त्यामुळे शॉक लागल्याने खिरोदा येथील तीन वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी खिरोद्यातील बेघर वस्तीमध्ये घडली. अफसर अजित तडवी असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना समजताच घटनास्थळी रावेरच्या तहसीलदार अधिकारी उषाराणी देवगुणे, खिरोदा सर्कल अधिकारी जे.डी.बंगाळे, तलाठी, सावदा पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी समाधान गायकवाड, आमदार शिरीष चौधरी यांचे स्विय सहाय्यक भानुदास मेढे, रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास ताठे, गौरखेडा ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील, सावखेडा उपसरपंच अल्लाउद्दीन तडवी तसेच नागरिकांनी बालकाच्या कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच लवकरात लवकर शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील असे आश्वासन तहसीलदार देवगुणे यांनी दिले. यावेळी घटनास्थळाचा पंचनामा देखील करण्यात आला. याप्रकरणी सावदा पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कुटुंबीयांना त्वरित शासनाकडून मदत मिळण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता शहरासह परिसरात वादळी पावसाने अर्धातास हजेरी लावली. सोसाट्याचा वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. सावदा शहरासह परिसरात शुक्रवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. वाऱ्यामुळे शहरातील वीजप्रवाह खंडित झाला. नंतर सुमारे ३० मिनिटे पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. जोरदार वाऱ्यामुळे केळीला फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी खिरोदा, सावखेडासह रावेर तालुक्यातील काही गावांमध्ये जोरदार वादळ झाले होते. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले होते. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.