आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील हॉकर्सचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेने पुढाकार घेत सर्वेक्षण केले. त्यात शहरात १,१५० फेरीवाले असल्याचे समोर आले. हा अहवाल पालिकेने जळगाव येथे सहायक कामगार आयुक्तांकडे पाठवला आहे. तेथून अहवाल नाशिक येथील कामगार आयुक्तांकडे रवाना होईल. आयुक्तालयातून नियुक्त अधिकारी भुसावळात येऊन ‘पथविक्रेता समिती’गठीत करण्यासाठी मतदान घेतील. या समितीच्या माध्यमातून हॉकर्स झोन आणि जागेचा प्रश्न मार्गी लावला जाईल. यासाठी किमान चार महिने लागतील.
या समितीचे अध्यक्षपद पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे असेल. शहरातील मुख्य बाजारपेठ, चौक आणि वर्दळीच्या रस्त्यांवर फेरीवाल्या व्यावसायिकांमुळे वारंवार वाहतूक कोंडी, व्यापारी व हॉकर्स असे वादविवाद उद््भवतात. त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होतो. ही जटील समस्या आहे. त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी पोलिस आणि पालिका प्रशासनाने पुढाकार घेतला. त्यात सर्वप्रथम हाॅकर्स, व्यापाऱ्यांची वेगवेगळी बैठक घेण्यात आली. त्यात हॉकर्स झोनच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही बाजूंचे म्हणने ऐकून घेण्यात आले.
यापुढील टप्प्यात शहरात नेमके किती फेरीवाले (हॉकर्स) आहेत? हे जाणून घेण्यासाठी शहरात सर्वेक्षण करण्यात आले. त्यात कोणत्या भागात किती भाजीपाला, फळ-फुल विक्रेते, कपडे, पादत्राणे, खाद्यपदार्थ व अन्य विक्रेते आहेत? ही नोंद घेण्यात आली. हा अहवाल पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी जळगावला कामगार आयुक्तांकडे पाठवला आहे.
११५० फेरीवाले
राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ नुसार केंद्र शासनाने विकसित केलेल्या मोबाइल अॅप द्वारे पालिका अंतर्गत फेरीवाल्याचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात १,१५० पथ विक्रेत्यांनी नोंदणी झाली. शहरी स्थिर,फिरते, तात्पुरते असे हे फेरीवाले आहेत. दरम्यान,फेरीवाल्यांचा आर्थिक विकास,शहर फेरीवाला आराखडा तयार करणे, कौशल्य प्रशिक्षण, फेरीवाला क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास,या कामी सर्वेक्षण पूर्ण केलेल्या पथ विक्रेत्यांचे नाव यादीत नसल्यास हरकती मागवल्या हाेत्या.मात्र, ३१ डिसेंबर पर्यंतच्या मुदतीत एकही हरकत प्राप्त झाली नाही.
समिती स्थापनेनंतर देणार फेरीवाल्यांना आेळखपत्र
मतदान होऊन पथ विक्रेता समितीची स्थापना होईल. यानंतर नोंदणीकृत सर्व फेरीवाल्यांना पालिकेच्या माध्यमातून आेळखपत्र देण्यात येईल.यावेळी पालिकेच्या माध्यमातून हॉकर्स झोनची निर्मिती केली जाणार आहे. विक्रेत्यांना देण्यात येणाऱ्या आेळखपत्रावर तो विक्रेता स्थिर आहे की फिरता? अथवा तात्पुरते आहे?अशी नोंद येईल.
हॉकर्सचा प्रश्न सुटणार
पालिकेच्या माध्यमातून शहरातील फेरीवाल्यांचे राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ नुसार सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आता पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे.शहरातील हॉकर्सचा प्रश्न लवकरच सुटेल. याअनुषंगाने पोलिस प्रशासन, व्यापारी, हॉकर्ससोबत बैठका झालेल्या आहेत. -संदीप चिद्रवार, मुख्याधिकारी,भुसावळ पालिका
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.