आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीओडी कायदा रद्द:यावल येथे ‘अग्निपथ’ला तीव्र विरोध ; टीओडी कायदा रद्द करत जुन्या कायद्यान्वये भरतीची मागणी

यावल9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सैन्यभरतीची तयारी करणाऱ्या तरुणांनी केंद्र शासनाच्या अग्निपथ योजनेला तीव्र विरोध केला व हा नवीन टीओडी कायदा रद्द करत जुन्या कायद्यान्वये सैन्य भरतीची मागणी करण्यात आली. अग्निपथ योजना ही सैन्यदलात जाण्यासाठी इच्छुक तरुणांच्या तोंडाला पाने पुसणारी असल्याचे तरूणांचे म्हणणे आहे. याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार भाग्यश्री भुसावरे यांना देण्यात आले असुन निवेदनाची प्रत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पाठवण्यात आली आहे. शुक्रवारी सैन्यदलाची तयारी करणाऱ्या तरुणांनी मोठ्या संख्येने एकत्र येत तहसिल कार्यालयात निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की, भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाकडून लागू केलेल्या लष्कर, नौदल, वायुदलात पदांसाठीच्या नविन नियमावलीनुसार भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरूणांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. भारतीय सैन्यात भरती होणाऱ्यांचे प्रमाण हे जास्त असते मात्र, या वर्षापासून चालत असलेली भरती प्रक्रिया सरकार रद्द करत अग्निपथ योजना सुरू केली. यात केवळ चार वर्षांचा सेवा कार्यकाळ तात्पुरत्या स्वरूपात दिला जाणार आहे. सैन्य भरतीसाठी इच्छुक तरूणांना तयारीसाठी चार ते पाच वर्ष लागतात आणि अशात जर चारच वर्षे नोकरी मिळत असेल त्यांचे पुढील भविष्य काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. भरती प्रक्रियेत टीओडी लावुन सेना कमकुवत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे तरूणांचे मोठया प्रमाणात नुकसान होणार आहे. तसेच अशा प्रकारे सैन्यातून परत आलेल्या तरूणांसाठी पुढील उपजीविकेसाठी साधन राहणार नाही, त्यात वय निघून गेलेले राहील मग, या तरुणांनी काय करावे असा प्रश्न निर्माण होणार आहे. केंद्र सरकारने पुर्वीच्या कायद्यान्वये भरती करावी नवीन अग्निपथ योजना रद्द करावी अशी मागणी तरुणांनी महसूल प्रशासनामार्फत संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देण्यावेळी सैन्य भरतीसाठी इच्छूक असलेले व त्यासाठी सध्या तयारी करत असलेले तरुण बहुसंख्येने उपस्थितत होते.

बातम्या आणखी आहेत...